घरक्रीडाऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Subscribe

बांगलादेश १०६; दिवसअखेर भारत ३ बाद १७४

इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाच्या दाहकतेने बांगलादेशी फलंदाजांचा ईडन गार्डन्सवरही पिच्छा पुरवला. भारतातील पहिल्यावहिल्या गुलाबी चेंडूच्या डे-नाईट कसोटीत जेमतेम तीन तासांतच अवघ्या ३१ व्या षटकात पाहुण्या बांगलादेशचा संघ १०६ धावांत गारद झाला. इशांतने २२ धावांतच बांगलादेशचा निम्मा संघ गारद करताना तेजतर्रार मारा केला. उमेशने ३, तर शमीने २ गडी बाद करत इशांतला उत्तम साथ दिली. तसेच यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, तसेच रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या स्लिपमधील खेळाडूंची चपळता तेज गोलंदाजांना पूरक प्रोत्साहन ठरली.

ईडनवरील ऐतिहासिक सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. एसजीच्या गुलाबी चेंडूंसमोर बांगलादेशी फलंदाजांनी हाराकिरी केली. इशांत, उमेश आणि शमीच्या भेदक मार्‍यामुळे पहिल्या तासाभरातच बांगलादेशची १२ षटकांनंतर ४ बाद २६ अशी अवस्था झाली. कर्णधार मोमिनुल, मोहम्मद मिथुन आणि मुशफिकूर रहीम हे तिघे आपले खातेही उघडू शकले नाहीत. सलामीवीर शदमन इस्लामने एक बाजू लावून धरत संयमी २९ धावा केल्या. मात्र, त्याला उमेशने माघारी पाठवले. यानंतर केवळ लिटन दास (२४) आणि नईम हसन (१९) यांनी दुहेरी धावसंख्या करता आली. त्यातच शमीचे अधिक उसळी घेतलेले चेंडू लिटन आणि नईम हसनच्या डोक्याला लागल्याने त्यांना सामन्यातून माघार घ्यावी लागली. या दोघांची जागा मेहेदी हसन आणि तैजुल इस्लाम यांना खेळण्याची संधी मिळाली. अखेर बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला.

- Advertisement -

याचे उत्तर देताना भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. फॉर्मात असलेला सलामीवीर मयांक अगरवालला १४ धावांवर अल-अमिन हुसेनने बाद केले, तर रोहित शर्माला २१ धावांवर इबादतने पायचीत पकडले. त्यानंतर कर्णधार कोहली फलंदाजीला आला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानेही चाहत्यांची निराशा केली नाही. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत आपले खाते उघडले. त्याला पुजाराची उत्तम साथ लाभली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. पुजाराने ९३ चेंडूत, तर कोहलीने ७६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इबादतने पुजाराला ५५ धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली. मात्र, कोहलीने पुढेही आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. दिवसअखेर भारताची ४६ षटकांत ३ बाद १७६ अशी धावसंख्या होती. त्यामुळे भारताला ६८ धावांची आघाडी मिळाली. दिवसअखेर कोहली ५९ आणि रहाणे २३ धावांवर नाबाद होता.

पुन्हा कोहलीचा विराट विक्रम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद ५००० धावांचा टप्पा पार केला. त्याला या धावा पूर्ण करण्यासाठी अवघे ८६ डाव लागले. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे होता. त्याने कर्णधार म्हणून ५००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ९७ डाव घेतले होते.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश : पहिला डाव – ३०.३ षटकांत सर्वबाद १०६ (शदमन २९, लिटन २४; इशांत ५/२२, उमेश ३/२९, शमी २/३६) वि. भारत : पहिला डाव – ४६ षटकांत ३ बाद १७४ (कोहली नाबाद ५९, पुजारा ५५; इबादत २/६१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -