घरक्रीडापाहा कुठे केला भारताच्या गोल्डन 'गर्ल'ने साखरपुडा!

पाहा कुठे केला भारताच्या गोल्डन ‘गर्ल’ने साखरपुडा!

Subscribe

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८ व्या एशियन गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तिथून परतताच तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. याचे कारण म्हणजे तिचा कुस्तीपटू सोमवीर राठी याच्याशी साखरपुडा झाला आहे.

एशियन गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक मिळवणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला आहे. तिचा साखरपुडा कुस्तीपटू सोमवीर राठी याच्याशी झाला आहे. मात्र, या साखपुढ्याचे स्थळ जरा विचित्रच आहे. विनेश जकार्तावरून परत येताच तिचा सोमवीरशी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साखरपुडा झाला आहे.

विनेश आणि सोमवीर राठी जुने मित्र 

सोमवीर राठी हा सुद्धा कुस्तीपटू आहे. तो कुस्तीच्या ग्रीको-रोमन प्रकारात खेळतो. त्याची आणि विनेशची खूप जुनी मैत्री आहे. ते दोघे एकमेकांना ७-८ वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे त्यांनी या मैत्रीचे रूपांतर आता लग्नात करायचे ठरवले आहे. काही दिवसांपूर्वीच विनेशने सोमवीर सोबत आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तेव्हापासून या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे म्हटले जात होते.

भालाफेकपटू नीरज चोप्राशी विनेशचे नाव जोडले गेले होते 

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा होती. एशियन गेम्समध्ये कुस्ती स्पर्धा सुरू असताना नीरज विनेशचा सामना पाहायला आला होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी या दोघांमध्ये काहीतरी असल्याची चर्चा सुरू केली होती. मात्र, विनेश आणि नीरज या दोघांनीही या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे सांगितले होते.

एशियन गेम्समध्ये विनेशची सुवर्ण कामगिरी 

एशियन गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजनी गटात विनेशने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तिने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या युकी इरी हिचा ६-२ असा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यामुळे या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -