घरक्रीडाKL Rahul : मी विश्वचषक खेळू शकेन असे वाटलेही नव्हते; शस्त्रक्रियेनंतरच्या कठीण...

KL Rahul : मी विश्वचषक खेळू शकेन असे वाटलेही नव्हते; शस्त्रक्रियेनंतरच्या कठीण काळावर राहुलचे भाष्य

Subscribe

नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत 452 धावांची खेळी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल म्हणतो की, एक काळ असा होता की, मी विश्वचषक खेळू शकेन असे वाटलेही नव्हते. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन आणि यंदा भारतात पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलने स्टार स्पोर्ट्सच्या ‘बिलीव्ह’ शोमध्ये आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केले. (I never thought I would be able to play the World Cup KL Rahul comments on the difficult period after the surgery)

स्टार स्पोर्ट्सच्या ‘बिलीव्ह’ या शोमध्ये बोलताना केएल राहुल म्हणाला की, शस्रक्रियेनंतर भारतीय संघात पुनरागमन करण्याचे माझ्यावर दडपण होते, कारण  त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होतो. शस्त्रक्रियेनंतर एक वेळ अशी होती की, तीन-चार आठवडे मी माझ्या पायावर नीट उभाही राहू शकत नव्हतो. अशावेळी यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचा विचार करणेही माझ्यासाठी खूप कठीण होते.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : भक्ती कमी आणि मतांचा व्यापार जास्त, संजय राऊत यांचा भाजपाला टोला

केएल राहुल म्हणाला की, मे महिन्यात माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि सर्जन म्हणाले होते की, मी पाच महिने खेळू शकणार नाही. याशिवाय विश्वचषक खेळण्यासाठी माझ्या थेट संघात निवड होऊ शकणार नव्हती. त्याआधी काही सराव सामने खेळणे आवश्यक होते. त्यामुळे मी जास्त ताण न घेता जे होईल ते होईल, असा विचार करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मी सगळ्यांना असं रडताना, निराश झालेलं कधीच पाहिलं नव्हतं

विश्वचषक 2019 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या 2019 विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाल्या की, विश्वचषक स्पर्धेत आम्ही सर्व आत्मविश्वासाने भरलेले होतो आणि त्यामुळे आम्ही जेतेपद जिंकू शकणार नाही, असा कधीच विचार केला नव्हता. पहिल्या फेरीत आम्ही काही शानदार विजयांची नोंद केली. काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी झाली, पण आम्ही अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग तयार केला होता. आम्ही हरायला तयार नव्हतो, त्यामुळे उपांत्य फेरीतील पराभवाने आम्हा सर्वांनाच धक्का बसला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी जेव्हा उपांत्य फेरी सामन्यात खेळत होते, तेव्हा वाटले की, काहीतरी चमत्कार होईल आणि आपण जिंकू, मात्र तसे झाले नाही. पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये आम्ही सर्वजण भावूक होतो. मला तो दिवस अजूनही आठवतो आहे, कारण मी सगळ्यांना असं रडताना आणि निराश झालेलं कधीच पाहिलं नव्हतं. ती चांगली आठवण नाही, पण आमच्या सर्वांसाठी एक धडा होता.

हेही वाचा – ICU Guidelines : तुमचा आप्त ICU मध्ये आहे का? असेल तर केंद्राची नवी नियमावली वाचाच…

पुढच्या विश्वचषकात आम्हाला आणखी चांगले करायचे आहे

केएल राहुल म्हणाला की, तुम्ही वर्षभर कितीही चांगले खेळलात तरी जेव्हा तुम्ही 10, 15 वर्षांनंतर निवृत्त होत, तेव्हा तुमची कारकीर्द धावांनी, विकेट्ने किंवा द्विपक्षीय मालिकेतील विजयाने लक्षात ठेवली जाणार नाही, तर विश्वचषकातील तुमच्या कामगिरीने लक्षात ठेवली जाणार आहे. त्यामुळे आम्हाला पुढच्या विश्वचषकात आणखी चांगले करायचे आहे, असा विश्वास केएल राहुलने व्यक्त केला.

केएल राहुलची विश्वचषकातील कामगिरी

दरम्यान, विश्वचषकातील केएल राहुलच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 97 धावांची दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 62 चेंडूत शतक झळकावले. संपूर्ण स्पर्धेत 11 सामन्यात 452 धावा करण्यासोबतच त्याने विकेटच्या मागे 15 झेलही घेतले. सलग दहा सामने जिंकून भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला होता, पण तिने ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -