घरक्रीडाटोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीचे समाधान, पॅरिसमध्ये पदकाचा रंग बदलण्याचे लोव्हलिनाचे लक्ष्य 

टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीचे समाधान, पॅरिसमध्ये पदकाचा रंग बदलण्याचे लोव्हलिनाचे लक्ष्य 

Subscribe

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी लोव्हलिना ही विजेंदर सिंग (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्यानंतर तिसरी भारतीय बॉक्सर ठरली.

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) दमदार कामगिरी करताना कांस्यपदक पटकावले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती भारताची केवळ तिसरी बॉक्सर ठरली. या कामगिरीबाबत तिला आनंद आहे. परंतु, आता तिचे २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. मला आता पुन्हा नव्याने तयारीला सुरुवात करावी लागेल. मी तयारीत कोणतीही कमी ठेवणार नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. पदकाचा रंग बदलण्याचा माझा प्रयत्न असेल. परंतु, त्यापूर्वी राष्ट्रकुल, एशियाड आणि जागतिक स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे मला या स्पर्धांबाबतही विचार करावा लागेल, असे लोव्हलिना म्हणाली.

भविष्यात बुसेनाझला पराभूत करेन 

टोकियोमध्ये ऑलिम्पिक पदार्पणात लोव्हलिनाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यश आले होते. उपांत्यपूर्व फेरीत चेन निन-चेनचा पराभव करत तिने पदक पक्के केले होते. मात्र, उपांत्य फेरीत तिला तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलिकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात काही चुका झाल्याचे लोव्हलिनाने मान्य केले. मी या लढतीसाठी योजना आखली होती, पण त्यानुसार मला खेळ करता आला नाही. बुसेनाझ तांत्रिकदृष्ट्या नाही, पण शारीरिकदृष्ट्या माझ्यापेक्षा अधिक कणखर होती. परंतु, भविष्यात तिला मी पराभूत करू शकेन, असे लोव्हलिनाने सांगितले.

विजेंदर, मेरीला आनंद झाला  

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी लोव्हलिना ही विजेंदर सिंग (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्यानंतर तिसरी भारतीय बॉक्सर ठरली. याबाबत विचारले असता लोव्हलिना म्हणाली, ते दोघेही महान खेळाडू आहेत. मलाही दमदार कामगिरी करत देशासाठी अनेक पदके जिंकायची आहेत. मी टोकियोमध्ये पदक जिंकल्याचा विजेंदर आणि मेरी यांना आनंद होता. त्यांनी अभिनंदन करतानाच भविष्यासाठी मला शुभेच्छा दिल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -