घरक्रीडामहाराष्ट्र केसरीत पैलवानांना योग्य मोबदला कधी मिळणार?

महाराष्ट्र केसरीत पैलवानांना योग्य मोबदला कधी मिळणार?

Subscribe

महाराष्ट्र केसरी ही कुस्तीतील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा! यंदा ही स्पर्धा २ ते ७ जानेवारी या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे. दरवेळप्रमाणेच यावेळीही या स्पर्धेसाठी बरीच तयारी करण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यामुळे या स्पर्धेला इतके महत्त्व आले आहे, त्या पैलवानांना हवे तसे मानधन मिळत नाही. तसेच या पैलवानांची डोपिंग चाचणीही होत नाही. या गोष्टींचा कुस्तीगीर परिषदेने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा मोठ्या थाटात पार पडणार आहे. दरवर्षी स्पर्धा होतात, आयोजक छोटी-मोठी बक्षिसे देतात, पण कुस्तीगीर परिषदेने यावर्षीपासून प्रत्येक वजनी गटाची बक्षिसे जाहीर करायला हवीत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रम किती मोठा आहे, हे आम्हाला समजत आहे. मात्र, या स्पर्धेतील विजेत्या पैलवानांना काय बक्षिसे मिळणार, हे अजूनही ठाऊक नाही. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला फार महत्त्व आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या स्पर्धांपैकी ही एक! मात्र, अजूनही पैलवानांना हवे तसे मानधन मिळत नाही. या स्पर्धेदरम्यान पदाधिकारी चांगल्या हॉटेल्समध्ये राहतात. त्यांच्याप्रमाणेच खेळाडूंसाठी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय असायला हवी. पदाधिकारी मंडळींना मानधन मिळते. त्यांनी दिलदारपणा दाखवून हे मानधन नाकारले पाहिजे.

- Advertisement -

खिशातले पैसे कुस्तीसाठी खर्च होतात, असे हे पदाधिकारी भेटल्यावर सांगतात. मग तुम्ही पाकिटे कशाला घेता? यंदाच्या वर्षी कोणत्या पदाधिकार्‍याला किती मानधन मिळाले, हे जाहीर करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास मला सोशल मीडिया, तसेच टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही माहिती सगळ्यांसमोर आणावी लागेल. पंचांना आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात योगदान देणार्‍यांना, त्यांच्या कष्टाचा मोबदला नक्कीच मिळाला पाहिजे. मात्र, पदाधिकार्‍यांना मानधन देण्याची खरच आवश्यकता आहे का? विरोध करायचा म्हणून विरोध नको, पण याविरुद्ध सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. आयोजकांनी दिलेल्या एक-एक रुपयांचा हिशोब कुस्तीगीर परिषदेने लोकांसमोर मांडला पाहिजे. तसे झाल्यास आम्हाला प्रश्न पडणे बंद होईल. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांना अजूनही शाळेत गाद्या टाकून झोपावे लागते. त्यांची सोय हॉटेल्समध्ये करण्यात आली पाहिजे.

तसेच डोपिंग हासुद्धा गंभीर विषय आहे. गेली ४-५ वर्षे खेळाडूंची डोपिंग चाचणी करा, अशी मागणी मी करत आहे. मात्र, परिषद या मागणीकडे कानाडोळा करत आहे. त्याचप्रमाणे कुस्तीगीर परिषदेने काही बदल करणे आवश्यक आहे. गणपत आंदळकर यांच्या नावाने कुस्तीगीर परिषदेने एखादी शिष्यवृत्ती चालू करायला हवी. निवडणूकीच्या वेळी मी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, खेळाडूंना न्याय देण्यासाठी आम्ही झटत राहू, हे नक्की.

- Advertisement -

दत्तात्रय जाधव-सोंडोलीकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -