घरक्रीडाभारताच्या विजयात राहुल चमकला; जडेजा, शमी, सिराज यांचा प्रभावी मारा

भारताच्या विजयात राहुल चमकला; जडेजा, शमी, सिराज यांचा प्रभावी मारा

Subscribe

मुबई : लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजाच्या झुंजार अभेद्य शतकी भागीदारीमुळे यजमान भारताने पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स आणि 61 चेंडू राखून विजय मिळविला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली.

निम्मा संघ 20 षटकांत 83 धावांत गारद झाल्यावर मधल्या फळीत खेळणार्‍या लोकेश राहुलने पाऊणशे (75) धावांची नाबाद खेळी करून भारताचा विजय साकारला. तोच सामन्यात सर्वोत्तम ठरला. डावखुर्‍या जडेजाच्या साथीने राहुलने 123 चेंडूंत 108 धावांची भर घातली. त्याआधी सफाईदार यष्टीरक्षण करताना त्याने स्मिथ आणि झम्पा यांचे झेल टिपले. जडेजाने अष्टपैलू खेळ करताना राहुलला तोलामोलाची साथ देत 45 धावा केल्या, त्या 7 चौकारांनिशी. शिवाय त्याच्या फिरकीने स्मिथ आणि मॅक्सवेल हे दोन मोहरेही टिपले.

- Advertisement -

नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले अन् दुसर्‍याच षटकात सिराजने हेडचा त्रिफळा उडवला. कर्णधार स्मिथने मार्शच्या साथीने 63 चेंडूंत 72 धावांची भागीदारी रचल्यावर हार्दिक पंड्याने प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथला (22) यष्टीरक्षक राहुलकरवी झेलबाद केले.

उंचपुरा लबूशेनने सलामीवीर मार्शसह तिसर्‍या विकेटसाठी 43 चेंडूंत 52 धावांची भर घातली, पण कुलदीपच्या फिरकीवर लबूशेनचा छान झेल जडेजाने पकडला. कुलदीपची ही एकमेव विकेट!

- Advertisement -

सलामीवीर मार्शने तडाखेबंद फटकेबाजी करीत 65 चेंडूंत 81 धावा तडकावल्या, त्या 5 उत्तुंग षटकार आणि 10 चौकारांनिशी! जडेजाने त्याला सिराजकरवी झेलबाद केले.

मोहम्मद शमीचा दुसरा स्पेल खतरनाक ठरला (3-2-8-3). शमीने इंग्लिस, ग्रीन, स्टॉइनिस यांची झटपट तंबूत रवानगी केली. तिथेच कांगारूंच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या आशा मावळल्या. 5 बाद 169 वरून 188 धावांतच कांगारूंचा सारा संघ गारद करण्यात भारत यशस्वी झाला.

धावफलक : ऑस्ट्रेलिया 35.4 षटकांत 188(मिचेल मार्श 81, स्टीव स्मिथ 22, जोश इंग्लिस 26, शमी 6-2-17-3, सिराज 5.4-1-29-3, जडेजा 9-0-46-2) वि. भारत 39.5 षटकांत 5 बाद 191 (लोकेश राहुल नाबाद 75, हार्दिक पंड्या 25, रवींद्र जडेजा नाबाद 45, स्टार्क 9.5- 0-49-3) सामन्यात सर्वोत्तम लोकेश राहुल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -