घरक्रीडारोहितचे सुपरहिट द्विशतक

रोहितचे सुपरहिट द्विशतक

Subscribe

भारत ४९७; दक्षिण आफ्रिका दिवसअखेर २ बाद ९

सलामीवीर रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक झळकावल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत भारताने आपला पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. भारताच्या ४९७ धावांचे उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात २ बाद ९ अशी अवस्था होती. मोहम्मद शमीने डीन एल्गरला, तर उमेश यादवने क्विंटन डी कॉकला झटपट माघारी पाठवले. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसर्‍या दिवशी खराब प्रकाशामुळे लवकर खेळ थांबवण्यात आला.

या मालिकेत पहिल्यांदा कसोटीत सलामीवीर म्हणून खेळणार्‍या रोहितने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके केली होती. तिसर्‍या सामन्यात त्याने २५५ चेंडूत २८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २१२ धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ द्विशतके करणार्‍या रोहितचे कसोटीत हे पहिलेच द्विशतक ठरले. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतर भारताचा तिसरा फलंदाज आहे.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी ३ बाद २२४ वरून पुढे खेळताना रोहित आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध सुरुवात केली. मात्र, खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यावर रोहितने पुन्हा आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. लुंगी इंगिडी टाकत असलेल्या दिवसाच्या दहाव्या षटकात त्याने तीन चौकार लगावले. पुढच्याच षटकात रहाणेने एक धाव काढत आपले कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक पूर्ण केले. तसेच हे त्याचे २०१६ नंतर घरच्या मैदानावर पहिले शतक होते. रोहितने यापुढील षटकात आपल्या १५० धावा पूर्ण केल्या. रहाणेला शतकानंतर फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. कसोटीत पदार्पण करणार्‍या जॉर्ज लिंडेने त्याला ११५ धावांवर माघारी पाठवले. रहाणेने या धावा १९२ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. त्याने आणि रोहितने चौथ्या विकेटसाठी २६७ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतरही रोहितने आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्यामुळे लंचपर्यंत भारताची ४ बाद ३५७ अशी धावसंख्या होती. रोहित १९९ धावांवर नाबाद होता.

लंचनंतरच्या तिसर्‍या षटकात इंगिडीच्या गोलंदाजीवर रोहितने षटकार लगावत आपले द्विशतक झळकावले. या मालिकेत द्विशतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. पहिल्या कसोटीत मयांक अगरवाल, तर दुसर्‍या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने द्विशतक केले होते. मात्र, पुढच्याच षटकात तो पूल मारण्याच्या नादात २१२ धावांवर बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने इंगिडीकरवी झेलबाद केले. पुढे जाडेजा आणि वृद्धिमान साहा यांनी संयमाने फलंदाजी केली. मात्र, लिंडेने साहाचा २४ धावांवर त्रिफळा उडवला. जाडेजाने उत्तम फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, त्याला लिंडेनेच ५१ धावांवर बाद केले. यानंतर उमेश यादव फिरकीपटूंवर आक्रमण करत अवघ्या १० चेंडूत ३१ धावा चोपून काढल्या, ज्यात ५ षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर काही षटकांनी भारताने आपला डाव ९ बाद ४९७ वर घोषित केला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

भारत : पहिला डाव – ९ बाद ४९७ घोषित (रोहित २१२, रहाणे ११५, जाडेजा ५१; लिंडे ४/१२३, रबाडा ३/८५) वि. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव – २ बाद ९ (डी कॉक ४; शमी १/०, उमेश १/४).

रोहितने टाकले ब्रॅडमनना मागे

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात २१२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे तो ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत घरच्या मैदानावर सर्वाधिक सरासरी असणारा फलंदाज ठरला आहे. ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना कसोटीत ९८.२२ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. रोहितने आतापर्यंत भारतात कसोटी क्रिकेटमध्ये ९९.८४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ब्रॅडमन यांचा हा विक्रम तब्बल ७१ वर्षे कायम होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -