घरक्रीडाटीम इंडियाचा विजयी चौकार

टीम इंडियाचा विजयी चौकार

Subscribe

चौथ्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच पाचव्या सामन्यातही आघाडीच्या फळीतील फलंदाजांना अपयश आल्यानंतर अंबाती रायडू, विजय शंकर, हार्दिक पांड्याची चांगली फलंदाजी आणि गोलंदाजांच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका ४-१ अशी जिंकली.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने चौथ्या सामन्याप्रमाणेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मॅट हेनरीने रोहित शर्माला २ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर ट्रेंट बोल्टने शिखर धवनला (६) तर हेनरीने शुभमन गिलला (७) बाद केले. पुढे तिसर्‍या आणि चौथ्या सामन्याला मुकलेला महेंद्रसिंग धोनी पुनरागमनात काही खास करू शकला नाही. त्याला अवघी १ धावच करता आली. त्यामुळे भारताची दहाव्या षटकात ४ बाद १८ अशी अवस्था होती. मात्र यानंतर अंबाती रायडू आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळालेल्या विजय शंकरने भारताचा डाव सावरला. या दोघांनी सावधपणे फलंदाजी करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. मात्र शंकर ४५ धावांवर असताना धावचीत झाल्याने ही जोडी तुटली. त्याने आणि रायडूने ९८ धावांची भागीदारी केली. पुढे रायडूने ८६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

- Advertisement -

अर्धशतकानंतर त्याने आपली धावा करण्याची गती वाढवली. त्याने कॉलिन मुनरोच्या एकाच षटकात दोन षटकार लगावले. त्याने केदार जाधवच्या साथीने ७४ धावांची भागीदारी केली. मात्र फटकेबाजीच्या नादातच रायडू ९० धावांवर बाद झाला. त्याने या धावा ११३ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. त्याला हेनरीने मुनरोकरवी झेलबाद केले. तर हेनरीने त्याच्या पुढच्याच षटकात जाधवला ३४ धावांवर माघारी पाठवले. तो बाद झाला तेव्हा भारताची ४५.२ षटकांत ७ बाद २०३ अशी धावसंख्या होती. मात्र हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे भारताने ४९.५ षटकांत २५२ इतकी धावसंख्या उभारली. पांड्याने टॉड अ‍ॅस्टलच्या एकाच षटकात सलग तीन षटकार लगावले. त्याने एकूण २२ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४५ धावा काढल्या.

२५३ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. हेन्री निकोल्स (८) आणि कॉलिन मुनरो (२४) यांना शमीने तर पांड्याने रॉस टेलरला (१) बाद केल्यामुळे न्यूझीलंडची ३ बाद ३८ अशी अवस्था होती. यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि टॉम लेथमने न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यांनी ६७ धावांची भागीदारी केली. मात्र केदारच्या कामचलाऊ फिरकीची पुन्हा जादू चालली. त्याने विल्यम्सनला ३९ धावांवर बाद केले. तर लेथमला ३७ धावांवर चहलने पायचित केले. यानंतर जिमी निशम (४४) आणि मिचेल सॅन्टनर (२२) व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावा पार करता आल्या नाही. न्यूझीलंडला ४१ चेंडूंत ४९ धावांची गरज होती आणि १ विकेट शिल्लक होती. त्यावेळी हेनरीने पांड्याच्या एकाच षटकात दोन षटकार लगावत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र पुढच्या षटकात भुवनेश्वरने बोल्टला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात ९० धावा करणार्‍या रायडूला सामनावीराचा तर मालिकेत ९ विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

आता या दोन संघांमध्ये ६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ (रायडू ९०, शंकर ४५, पांड्या ४५; हेनरी ४/३५, ३/३९) विजयी वि. न्यूझीलंड ४४.१ षटकांत सर्वबाद २१७ (निशम ४४, विल्यम्सन ३९, लेथम ३७; चहल ३/४१, शमी २/३५, पांड्या २/५०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -