विंडीजने उडवला इंग्लंडचा धुव्वा

दुसर्‍या कसोटीत १० विकेट राखून विजयी, जिंकली मालिका

किमार रोचची भेदक गोलंदाजी आणि डॅरेन ब्रावोच्या संयमी अर्धशतकामुळे वेस्ट इंडिजने दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडवर १० विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे विंडीजने ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. विंडीजने पहिला कसोटी सामना ३८१ धावांनी जिंकला होता.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. किमार रोचच्या ४ आणि शॅनन गेब्रियलच्या ३ विकेटमुळे इंग्लंडला पहिल्या डावात १८७ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून मोईन अली (६०) आणि जॉनी बेअरस्टोव (५२) या दोघांनाच अर्धशतके करता आली. याला उत्तर देताना विंडीजने पहिल्या डावात डॅरेन ब्रावो (२१६ चेंडूंत ५०), क्रेग ब्रेथवेट (४९) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे ३०६ धावा केल्या. त्यामुळे विंडीजला पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी मिळाली.

यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना दुसर्‍या डावातही चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. रोच आणि जेसन होल्डरने ४-४ विकेट घेतल्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव १३२ धावांतच आटोपला. त्यामुळे विंडीजला सामना जिंकण्यासाठी १४ धावांचे आव्हान मिळाले. त्यांच्या सलामीवीरांनी हे आव्हान २.१ षटकांतच पूर्ण करत विंडीजच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.

या सामन्यात विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या खेळा आणि देशाप्रती दाखवलेल्या निष्ठेबद्दल त्याचे कौतुक होत आहे. तिसर्‍या दिवसाच्या खेळाआधी जोसेफला आपल्या आईच्या निधनाची बातमी कळली. मात्र हे दुःख विसरुन तो संघासाठी मैदानात उतरला आणि दुसर्‍या डावात इंग्लंडच्या २ फलंदाजांना माघारी पाठवले.