घरक्रीडानाजूक गं बाय ती .........

नाजूक गं बाय ती ………

Subscribe

‘उगाच काहीतरी काय! नाजूक बायका एवढं 100 मीटर्सचं अंतर धावतील काय? आणि त्या भले ‘हो’ म्हणतील. परंतु, त्यांच्या नाजूक शरीराला धावण्याचा त्रास सोसेल काय?’, आज अगदी हास्यास्पद, बालिश वाटणारे संवाद महिला अ‍ॅथलिट्सना धावण्यापासून वंचित ठेवत होते. ऑलिम्पिक सुरू होताना 1896 साली पुरुषांच्या 100 मीटर्स धावण्याच्या शर्यती मोठ्या थाटात सुरू झाल्या. परंतु, याच शर्यतीत भाग घ्यायला महिला अ‍ॅथलिट्सना 1928 साल उजाडलेलं पाहावं लागलं. त्यापेक्षा थोडं जास्त अंतर धावण्यासाठी म्हणजे 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत उतरण्यासाठी महिला अ‍ॅथलिट्सना 1948 साल उजाडलं.

मैदानाला दोन फेर्‍या मारण्याच्या 800 मीटर्स शर्यतीत उतरण्यासाठी महिलांना 1928 साली प्रथम परवानगी तर मिळाली, पण 1932 ते 1956 अशी तब्बल दोन तपं महिला अ‍ॅथलिट्सना मूग गिळून बसावं लागलं. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये महिला अ‍ॅथलिट्सना 800 मीटर्स शर्यतीत धावत येऊ लागलं. त्यानंतर 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये महिला 1500 मीटर्स शर्यतीत प्रथमच भाग घेऊ लागल्या. त्यापुढे 12 वर्षांनी पुढारलेल्या अमेरिकेत महिलांना 3000 मीटर्स आणि दीर्घ पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेता येऊ लागला. मजा म्हणजे महिलांना पुरुषांप्रमाणे मॅरेथॉन धावायची परवानगी मिळाली असली तरी 5000 मीटर्स, 10000 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स विश्वात सुरू झाल्याच नव्हत्या.

- Advertisement -

महिला अ‍ॅथलिट्सची घुसमट होत होती नुसती! एका-एका शर्यतीत धावण्याचे अधिकार, मंजुरी पुरुषसत्ताक अ‍ॅथलेटिक्स संघटनांकडून मिळवून घेऊन स्पर्धाशर्यतीत धावताना, शरीरात अनेक दशके कोंडलेला अफाट ऊर्जेचा वापर, ट्रॅकवरील शर्यत धावताना केलेल्या कृतीतून,सार्‍या जगाला दाखवून देताना, महिला अ‍ॅथलिट्स बेभान होत होत्या. जिंकल्यावर आनंदाने जल्लोष करीत होत्या. आनंदाश्रूंना मोकळी वाट करून देत होत्या.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती उशिरा म्हणजे 1983 साली सुरू झाल्या. तोवर पुरुषी सत्तेला धडक देणार्‍या महिला अ‍ॅथलिट बेधडकपणे पुरुष अ‍ॅथलिट्सच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धाशर्यतींत उतरू लागल्या. सार्‍याजणी नशीबवान नव्हत्या. अल्जेरियाच्या हसिबा बुलमरकाला अर्ध्या चड्डीत धावताना पाहून, कर्मठ लोक तिच्यावर दगड मारायचे. ते दगड चुकवीत हसिबाला सराव करायला लागायचा. कर्मठ वातावरणांत महिला अ‍ॅथलिट्सना अंगभर कपडे घालून धावायला लागायचं! एक ना दोन. अक्षरशः लाखो कहाण्यांनी महिला अ‍ॅथलेटिक्सविश्व हादरवून सोडलं. परंतु, 1983 च्या पहिल्यावहिल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतीत 3000 मीटर्स आणि मॅरेथॉन अशा दोन दीर्घपल्ल्याच्या शर्यतीत महिलांना धावायला मिळालं. त्यानंतर वरील दोन शर्यती ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झाल्या.

- Advertisement -

1987 साली रोम येथे लांब पल्याची 10000 मीटर्सची शर्यत, त्याबरोबर 10 किमी. चालण्याची शर्यत सुरू झाली. 1993 साली स्टुटगार्ट येथे महिलांची तिहेरी उडी, 1995 साली गोथेनबर्ग (स्वीडन) येथे 3000 मीटर्सची खास महिलांसाठीची शर्यत बंद करून त्याऐवजी पुरुषांप्रमाणे दीर्घपल्याची 5000 मीटर्स धावण्याची शर्यत सुरू झाली. 1999 साली सेव्हिल (स्पेन) येथे तर चक्क पुरुषांप्रमाणे पोल व्हॉल्ट, हातोडाफेक या ताकद दाखवणार्‍या स्पर्धा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत सुरू झाल्या. त्याचप्रमाणे 10 किमी चालण्याच्या शर्यतीऐवजी पुरुषांप्रमाणे 20 किमी चालण्याची शर्यत, 2005 मध्ये हेलसिंकी येथे चक्क 3000 मीटर्स स्टीपलचेस शर्यत महिलांच्या गटात सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी लंडन येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत 50 किमी चालण्याची शर्यत महिलांच्या गटात सुरू झाली. महिलांनी, पुरुषांच्या साथीने, आपल्या धावण्याच्या कक्षा अखेर रुंदावल्याच!

दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत, जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाने एक पाऊल पुढे टाकून स्त्री-पुरुष समानतेच्या काळात ‘मिश्र रिले’ ही नवी शर्यत सुरू केली. अतिशय जोरदार प्रतिसाद जगभरातल्या अ‍ॅथलिटसकडून मिळणार्‍या या शर्यतीत शनिवारी दोन प्राथमिक फेर्‍यांमध्ये एकूण 16 संघांनी कमालीची बहारदार कामगिरी केली. पहिल्याच शर्यतीत विश्वविक्रम झाला. अमेरिकन संघाने 3 मिनिटं 12.42 सेकंदांची वेळ देत स्टेडियम थरारून सोडलं.

दुसर्‍या शर्यतीत भारतीय चमुनेदेखील कमाल केली. हंगामातील सर्वोच्च वेळ देत तिसरा क्रमांक पटकावणार्‍या भारतीय चमूने आपल्या कामगिरीने टोकियो ऑलिम्पिकमध्येदेखील स्थान मिळवलं. हा लेख वाचेपर्यंत तुम्हाला अंतिम फेरीतील विजेता संघ कळला असेल. कोण जाणे. पुन्हा एकदा विश्वविक्रम या शर्यतीने पाहिलेला असू शकेल!

मजल दरमजल प्रवास करत जगभरच्या महिला अ‍ॅथलिट्स जागतिक पातळीवर असे काही धडाकेबाज विक्रम करत आहेत की त्यांच्या विश्वविक्रमी कामगिर्‍यांपुढे, अ‍ॅथलेटिक्समध्ये पाठी असलेल्या देशातील पुरुष अ‍ॅथलिट्सच्या कामगिर्‍यादेखील फिक्या पडाव्या! महिला अ‍ॅथलिट्सच्या आजवरच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्समधील प्रवासाकडे मान वळवून पाठी नुसतं पाहिलं ना, तरी त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे हे सहज उमगून येतं!

-उदय ठाकूरदेसाई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -