घरक्रीडाWTC Final : पुन्हा पावसाचा खेळखंडोबा; चौथ्या दिवसाचा खेळही उशिरानेच

WTC Final : पुन्हा पावसाचा खेळखंडोबा; चौथ्या दिवसाचा खेळही उशिरानेच

Subscribe

चौथ्या दिवशीही (आज) ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. साऊथहॅम्पटन येथे होत असलेल्या या सामन्यात पावसाने सतत व्यत्यय आणल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि ओले मैदान यामुळे पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता. दुसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ ६४.४ षटके टाकली गेली. तसेच तिसऱ्या दिवशी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साधारण ७६ षटकांचा खेळ झाला. परंतु, पावसाला सुरुवात झाल्याने खेळ लवकर थांबवावा लागला. आता चौथ्या दिवशीही पावसाचा खेळखंडोबा सुरु असून सामन्याला उशिराने सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती आयसीसी, बीसीसीआय आणि न्यूझीलंड क्रिकेट या तिन्ही बोर्डांनी दिली.

दिवसाची सुरुवातच पावसाने

चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (आज) साऊथहॅम्पटन येथे पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच दिवसाची सुरुवातच पावसाने झाली. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवसाला वेळेवर सुरुवात होऊ शकली नाही. सामना उशिराने सुरु होणार असल्याने खेळाडूंना फावला वेळ मिळाला. या वेळेत न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी टेबल टेनिस खेळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

न्यूझीलंड २ बाद १०१

त्याआधी तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणे (४९) आणि कर्णधार विराट कोहली (४४) यांच्या व्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज ४० धावांचा टप्पा पार करू शकला नाही. भारताच्या २१७ धावांचे उत्तर देताना तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची पहिल्या डावात २ बाद १०१ अशी धावसंख्या होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -