घरटेक-वेकमोबाईल पोर्टेबिलिटी बंद होणार?

मोबाईल पोर्टेबिलिटी बंद होणार?

Subscribe

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) लवकरच बंद होणार आहे. मार्च २०१९ नंतर ही सुविधा बंद होणार आहे. काय घडलं आहे नक्की?

चांगल्या ऑफर्स, कमी बिल आणि अनलिमिटेड डाटाच्या या युगामध्ये आपला मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलणं अतिशय सोपं होतं. पण आता जर ही सुविधा बंद होणार आहे असं म्हटलं तर? पुन्हा एकदा तुम्हाला जर तुमची कंपनी बदलायची असेल तर मोबाईल नंबरदेखील बदलावा लागणार आहे. कारण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) लवकरच बंद होणार आहे. मार्च २०१९ नंतर ही सुविधा बंद होणार आहे.

का बंद होणार एमएनपी सर्व्हिस?

इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचं (MNP) काम करणाऱ्या दोन्ही कंपन्या एमएनपी इंटरॅक्शन टेलिकॉम सॉल्युशन्स आणि सिनिवर्स टेक्नॉलॉजी सध्या नुकसानीत आहेत. या कंपन्यांनी टेलिकॉम विभाग (DoT) ला यासंदर्भात माहिती दिली असून जानेवारी नंतर पोर्टींग शुल्कामध्ये ८० टक्के कपात करण्यात आल्यामुळं त्यांचं नुकसान होत आहे. तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ नंतर या कंपन्यांचा परवानादेखील संपत आहे. त्यामुळं या कंपन्या ही सुविधा बंद करणार आहेत.

- Advertisement -

ग्राहकांचं होणार नुकसान

ही सेवा बंद केल्यास, सर्वात जास्त नुकसान हे ग्राहकांचं होणार आहे. खराब कॉलिंग, बिलिंगसंबंधी अडचणी आणि अन्य गोष्टींसाठी मोबाईल कंपनी सेवा बदलायची असल्यास, ग्राहकांना आता मोबाईल क्रमांकदेखील बदलावा लागेल. मात्र टेलिकॉम विभागानं यासाठी पर्यायी कंपनी शोधण्यात येईल असं सांगितलं असून दुसऱ्या कंपन्यांना परवाना देऊन एमएनपी सर्व्हिस चालू ठेवता येऊ शकते असं स्पष्ट केलं आहे.

परवाना स्वाधीन करणार कंपनी

आपला परवाना स्वाधीन करण्यात येईल असं दक्षिण आणि पूर्व भारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचं काम बघणारी कंपनी एमएनपी इंटरकनेक्शननं सांगितलं आहे. त्यानंतर काम बंद केलं जाईल. तर उत्तर आणि पश्चिम भारतात कार्यरत असणाऱ्या सिनवर्स टेकला खूपच नुकसान सहन करावं लागलं आहे. ट्रायच्या एमएनपी चार्जेसमध्ये कपात करण्याच्या आदेशामुळं त्यांना बरंच नुकसान सहन करावं लागलं आहे. हा चार्ज जानेवारी २०१८ मध्ये १९ रुपयांवरून ४ रुपये इतका करण्यात आला होता. मार्च २०१८ पर्यंत कंपन्यांनी ३७ कोटी पोर्टेबिलिटी रिक्वेस्ट हँडल केल्या असून मे मध्ये त्यांनी २ कोटी अर्जांची प्रक्रिया केली आहे.

- Advertisement -

सध्या न्यायालयात केस चालू

ट्रायनं आपल्या मनमानी आणि अपारदर्शी कारभारानं एमएनपी चार्जमध्ये कपात केली असून याविरोधात कंपन्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. यासंदर्भातल ४ जुलैला सुनावणी होणार असून यामधून कोणताही पर्याय न निघाल्यास ही सेवा बंद करण्यात येईल. सध्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याइतकाही पैसा कंपनीकडे नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान, रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा टेलिसर्व्हिस, एअरसेल यांनी आपली सेवा बंद केल्यामुळंसुद्धा ग्राहकांनी एमएनपी सेवेचा लाभ घेतला होता. एमएनपी सर्व्हिसमुळं क्रमांक न बदलता कंपनी बदलणं सहज सोपं झालं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -