घरठाणेकल्याण ग्रामीणमध्ये बोटॅनिकल गार्डन उभारणार

कल्याण ग्रामीणमध्ये बोटॅनिकल गार्डन उभारणार

Subscribe

मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण डोंबिवलीत मोठे गार्डन वा पार्क नाहीत, अशी स्थिती आहे. सगळीकडे सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहेत. याच कल्याण डोंबिवली परिसरात कल्याण ग्रामीण क्षेत्रात उम्बार्ली, भाल व दावडी या गावात मोठ्या प्रमाणावर वन विभागाची जमीन आहे. याच जागेवर बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी गेले दोन वर्षे प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांना यश आले असून पर्यटन विभागाने त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीत विस्तीर्ण आणि सुंदर निसर्गरम्य असा खाडी किनारा आहे. मात्र त्या खाडी किनाऱ्यावर गणेश घाट वगळता काहीही विकसित करता आलेले नाही. शहरात मोकळ्या जागा नाहीत. उद्यानाच्या जागांवर देखील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे या भागात विरंगुळ्यासाठी मोठी उद्याने व पार्क नाहीत. महापालिका क्षेत्रात टिटवाळा गणेश मंदिर वगळता एकही तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना पर्यटनासाठी व फिरायला जाण्यासाठी सुद्धा शहराबाहेरच जावे लागते.

- Advertisement -

डोंबिवली पासून अगदी जवळच्या अंतरावर उम्बार्ली, भाल व दावडी गावे आहेत. या गावांमध्ये असलेल्या वन विभागाची मोठी जमीन आहे. मॉर्निंग वाकसाठी जाणाऱ्या, निसर्गप्रेमी मंडळींनी येथे अनेक झाडे लावली, पाण्याचे मृत झालेले झरे जिवंत केले व वनसंपदा जोपासली. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे कसलेही योगदान नाही. आता वनसंपदा बहरली असल्याने या भागात पक्षांचे जणू अभयारण्य तयार झाले आहे. आमदार राजू पाटील यांच्या बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी पक्षी अभयारण्य व बोटॅनिकल गार्डन विकसित करण्यासाठी २०२० पासून प्रयत्न सुरु केले. त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे पर्यटन विभागाने त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे या बोटॅनिकल गार्डनच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, कल्याण डोंबिवलीच्या सौंदर्यात त्यामुळे आणखी भर पडेल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -