घरपालघरनो पार्कींग विभागात उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा

नो पार्कींग विभागात उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा

Subscribe

मुंबई आणि वसई-विरार परिसरात कामासाठी जाणारे अनेक जण ओस्तवाल परिसरातील ड्रीम हाऊस ते बिग बाझारपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिवसभर आपल्या दुचाकी पार्कींग करून ठेवतात.

बोईसर: बोईसर परिसरातील मुख्य रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणी नो पार्कींग झोनमध्ये बेकायदेशीर उभ्या असणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यास सुरूवात केली आहे.त्यामुळे कायम गर्दीच्या विळख्यात असलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.ही कारवाई अशीच नियमित सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बोईसर परिसरातील स्टेशन रस्ता,नवापूर नाका,तारापूर रस्ता आणि ओस्तवाल परिसर या ठिकाणी मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे पार्कींग करून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते.त्याचप्रमाणे तारापूर एमआयडीसीमध्ये ये-जा करणार्‍या कामगारांना गर्दीतून वाट काढत स्टेशन गाठावे लागते.मुंबई आणि वसई-विरार परिसरात कामासाठी जाणारे अनेक जण ओस्तवाल परिसरातील ड्रीम हाऊस ते बिग बाझारपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिवसभर आपल्या दुचाकी पार्कींग करून ठेवतात.

या दुचाकी लॉक करून ठेवल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.त्याचप्रमाणे खरेदीसाठी आलेले बेशिस्त ग्राहक भर रस्त्यात आपली दुचाकी आणि चारचाकी गाड्या लावून जातात.यामुळे एकूण चार पदरी असणार्‍या या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील एक एक लेन बंद होऊन वाहतूक कोंडी होते.बोईसर ग्रामपंचायतीने भर रस्त्यावर बेकायदेशीर पार्कींग करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाकडे अनेक वेळा मागणी केली होती.त्यानुसार आजपासून वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी नो पार्कींगमध्ये उभ्या असणार्‍या या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.त्याचप्रमाणे बोईसर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे,विजेच्या खांबांवर आणि मुख्य रस्त्यांवर लावलेले शेकडो बेकायदेशीर बॅनर्स हटवून परिसर मोकळा केला.या कारवाईच्या वेळेस बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलम संखे आणि ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे हे देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -