घरठाणेछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला म्युकरमायकोसिस रुग्णालयाचा विशेष दर्जा मिळाल्यानंतर आणि एकीकडे या आजाराने रुग्ण दगावणार्‍यांची संख्या समोर येत असतानाच ठाण्यात म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या एक नव्हे तर पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याची आनंददायी बाब पुढे आली आहे. या आजारावरील शस्त्रक्रिया आणि औषधोपचार ही खर्चिक गोष्ट असताना ठाणे महापालिकेने त्या ५ रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत, हे विशेष! हे सर्व रुग्ण उपचार घेत सुखरूप घरी परतल्याने सरकारी रुग्णालयात खूप चांगले उपचार होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाकडून म्युकरमायकोसिसचे हे ५ रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाठविले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तात्काळ या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्ट महिन्यात २ रुग्णांवर, तर दुसर्‍या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. हे स्त्री-पुरुष रुग्ण ३० ते ५० या वयोगटातील आहेत.

- Advertisement -

या आजाराच्या उपचारासाठी साधारण दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित धरण्यात आला आहे. ह्या आजाराची उपचार पद्धत महागडी आहे. सुमारे ५ ते ६ लाख रुपये एवढा खर्च येतो. यामध्ये शस्त्रक्रियेपासून इंजेक्शन आणि औषध आदी खर्चाचा समावेश आहे. या आजारासाठी रुग्णालयात विशेष ओपीडी आणि वॉर्डची निर्मिती केली जात असून हे वॉर्ड साधारण १५ बेड्सचे आहेत. तसेच या आजाराचे निदान होऊ लागल्याने ठामपा हद्दी व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून याबाबत विचारणा केली जात आहे. तसेच महापालिकेने आवश्यक औषध पुरवठाही उपलब्ध करून दिलेला आहे. डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या पाचही शस्त्रक्रिया केल्या आहेत.

यामध्ये मेडिसिन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर तसेच डॉ.अमोल खळे या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.‘या आजाराचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यावर रुग्णांनी रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. योग्य वेळी निदान झाल्याने आणि औषध घेतल्याने या आजारातून रुग्ण बरेही होत आहेत. हा आजार यापूर्वीही दुसर्‍या आजारांमुळे होत होता. आता तो कोरोना या आजारातही पुढे आलेला आहे. ठामपाची डॉक्टरांची टीम या आजाराला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे.’- बी.एस. जाधव, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठामपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -