घरमुंबईभिवंडीत भाजपला धोका ...सेनेची ताकद वाढली, काँग्रेसचीही सरशी !

भिवंडीत भाजपला धोका …सेनेची ताकद वाढली, काँग्रेसचीही सरशी !

Subscribe

भिवंडीपासून ते कल्याण, शहापूर मुरबाडपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. बहुतांशी ग्रामीण परिसर या मतदार संघात मोडतो. गेली दोन टर्म भाजपचा खासदार निवडून येत असला तरी सुध्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भिवंडीत काँग्रेसची सरशी झाली आहे. त्यामुळे भाजपला धोका निर्माण झाला आहे. या मतदार संघात भाजपचे तीन आमदार असले तरी सुध्दा राष्ट्रवादीचा एक विद्यमान आमदार आणि एक माजी आमदार पुत्राला गळाला लावण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. त्यामुळे सेनेचीही ताकद वाढली आहे. म्हणून युतीवरच शिवसेना, भाजपची पुढची गणित ठरणार आहेत.

२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे खासदार झाले होते. पण २०१४ च्या मोदी लाटेत भाजपचा खासदार निवडून आला. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे कपिल पाटील हे पुन्हा खासदार झाले. मुस्लीम आदिवासी आगरी आणि कुणबी असा संमिश्र लोकवस्तीचा हा मतदार संघ आहे. भिवंडीत एकूण तीन विधानसभा मतदार संघ येतात. भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्व हे शिवसेनेकडे आहेत, तर भिवंडी पश्चिम हा भाजपकडे आहे. लोकसभा निवडणुकीत भिवंडी पश्चिम विधानसभेत २५ हजार ५२० तर भिवंडी पूर्व विधानसभेत २३ हजार ८०७ मतांनी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भिवंडीत शिवसेना आणि भाजपला धोका असल्याचे स्पष्ट दिसून येतय. शहापूर आणि मुरबाड या दोन विधानसभा मतदार संघातील तालुक्यात सर्वाधिक मतदान हे कुणबी समाजाचे आहे.

- Advertisement -

कुणबी समाजाची मते ही निर्णायक ठरत असतात. मात्र शहापूर आणि मुरबाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. शहापूरचे आमदार पांडूरंग बरोरा हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. मात्र त्यामुळे माजी आमदार दौलत दरोडा गट अस्वस्थ झाला आहे. २०१४ च्या निवडणुकीत दरोडा यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. फोडाफोडीमुळे शहापूरमधील राजकीय समीकरण बदलले आहे. सेनेकडून बरोरा आणि दरोडा हे दोघेही इच्छूक आहेत. मात्र उमेदवारी मिळण्याच्या आश्वासनावरच बरोरा सेनेत आले आहेत. त्यामुळे सेनेकडून बरोरा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यास दरोडा हे काय निर्णय घेतात यावर पुढील गणित ठरणार आहेत. मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे आमदार आहेत. मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपूत्र सुभाष पवार यांनी नुकताच सेनेत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीकडून सिडकोचे माजी चेअरमन प्रमोद हिंदुराव हे सक्रीय झाले आहेत. गोटीराम पवार हे अनेक वर्षे आमदार होते. त्यामुळे आघाडीकडून गोटीराम पवार कि हिंदुराव यांच्या एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने शहापूर १४ हजार आणि मुरबाडमधून ६४ हजाराची आघाडी घेतली आहे. कल्याण पश्चिमेत भाजपचे आमदार नरेंद्र पवार आहेत. कल्याणातून भाजपला ६८ हजाराची आघाडी मिळाली आहे. मात्र कल्याणवर शिवसेनेने दावा केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सेनेचे विजय साळवी यांचा अवघ्या २२०० मतांनी पराभव झाला होता. मात्र युती झाल्यास सेनेतून बंडखोरी हेाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेना भाजपची युती होणार कि नाही यावर अनेक समीकरण बदलणार आहेत.

- Advertisement -

हे आहेत आमदार
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूर – पांडूरंग बरोरा राष्ट्रवादी (काँग्रेस)
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले ( भाजप)
भिवंडी पूर्व – लक्ष्मण म्हात्रे (शिवसेना )
कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार (भाजप)
मुरबाड – किसन कथोरे (भाजप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -