घरमहाराष्ट्रअशी ही पळवापळवी!

अशी ही पळवापळवी!

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर आणि उमेदवारांची पळवापळवी हे चित्र नेहमीचे झाले आहे. पण, भाजपने लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर यंदा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात नेते, आमदार आणि आता उमेदवारांची एकच पळवापळवी सुरु झाली आहे. यामुळे ही निवडणुक आहे की घोडे बाजार असे आता उघडपणे बोलले जात आहे. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेने केल्यानंतर काँग्रेस आघाडीने युतीविरोधात तोच खेळ करायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि माजी आमदार दौलत दरोडा यांना सोमवारी राष्ट्रवादीत प्रवेश देताना विरोधकांनी हा खेळ खेळला. काँग्रेस आमदार भारत भालके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपत जाणार अशी चर्चा होती. भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती. पण भाजपकडे उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेल्या भारत भालके यांना आश्वासन देऊनही भाजपने त्यांना उमेदवारी काही दिली नाही. यामुळे काँग्रेस, भाजप असा प्रवास करत शेवटी भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग वरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अजित पवार प्रचंड संतापले आहेत.

- Advertisement -

याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांना प्रवेश देताना अजित पवार यांनी काट्याने काटा काढण्याचा निर्णय घेतला. शहापूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीची ताकद आणि शिवसेनेतील नाराज यांना एकत्र करून वरोरा यांना धडा शिकवण्याचे ठरवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधान सभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नमिता यांना राष्ट्रवादीने केज मतदारसंघातून तिकीट दिले होते. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंदडा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आता अचानक त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतरही राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली होती. मात्र आपल्या मुंदडा घराण्याला राष्ट्रवादी काँग्रेसने भरभरून दिले असतानाही नमिता यांनी शेवटच्या क्षणी आपला शब्द फिरवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -