घरमहाराष्ट्रनाशिकउत्तर महाराष्ट्रात युतीच्या अपेक्षांवर पाणी

उत्तर महाराष्ट्रात युतीच्या अपेक्षांवर पाणी

Subscribe

गेल्या लोकसभा निवडणूक निकालाने हुरळून गेलेल्या भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांना गृहीत धरण्याची चूक महागात पडल्याचे उत्तर महाराष्ट्रातील निकालाने देखील दाखवून दिले. शिवाय, पसस्पर द्वेषाने पछाडलेल्या सत्तेतील या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला.

गेल्या लोकसभा निवडणूक निकालाने हुरळून गेलेल्या भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांना गृहीत धरण्याची चूक महागात पडल्याचे उत्तर महाराष्ट्रातील निकालाने देखील दाखवून दिले. शिवाय, पसस्पर द्वेषाने पछाडलेल्या सत्तेतील या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला. विभागातील ३५ पैकी तीस जागा जिंकण्याची वल्गना करणार्‍या फडणवीस सरकारमधील ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांसह भाजपेयींना आत्मचिंतन करावयास लावणार्‍या या निकालाने भाजपला चौदा तर शिवसेनेला पाच जागांवर रोखले. भाजपने दुर्लक्षित केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्येचा धक्कादायक पराभव उत्तर महाराष्ट्रातील निकालाचे वैशिष्ट्य ठरले.

एकनाथ खडसे, गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावीत, छगन भुजबळ आदी बड्या नेत्यांच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभागामुळे या विभागाच्या निवडणूकीला कमालीच्या चुरशीचे स्वरूप होते. लोकसभेतील सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्क्याने खिशात घातल्याने भाजप-शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला होता. हाच ‘ट्रेंड’ विधानसभेत ठेवण्याचा शाब्दिक चंग बांधलेल्या युतीला प्रत्यक्षात; मात्र एकी राखता आली नाही. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आणि युतीचे बडे नेते गळ्यात गळे घालताना इकडे स्थानिक; मात्र परस्परांविरोधात बाह्या सावरत राहिले. तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकोपा दाखवत बारा जागा पदरात पाडून घेतल्या. धुळे व मालेगाव शहरांत एमआयएमने खाते उघडले, तर साक्रीत अपक्ष मंजुळा गावित विजय प्राप्त केला.

- Advertisement -

नाशकात ‘पवार पॉवर’

लोकसभा निवडणुकीत पंधरापैकी चौदा विधानसभा क्षेत्रांत लक्षणीय मताधिक्य मिळवणार्‍या भाजप-सेनेला विधानसभेत; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक सहा जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला. भाजपने पाच, शिवसेनेने दोन तर काँग्रेस व एमआयएमने प्रत्येकी एका जागेवर कब्जा केला. राष्ट्रवादीचे बाहुबली नेते छगन भुजबळ, राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांचे विजय लक्षणीय ठरले. शिवसेनेच्या अनिल कदम (निफाड), राजाभाऊ वाजे (सिन्नर) व योगेश घोलप (देवळाली), तसेच काँग्रेसमधून सेनेत आलेल्या निर्मला गावित (इगतपुरी), राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ (नांदगाव) व दीपिका चव्हाण (बागलाण) तसेच काँग्रेसच्या आसिफ शेख (मालेगाव मध्य) या विद्यमान आमदारांना मतदारांनी घरी बसवले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात अटीतटीची लढत होऊन भाजपच्या राहुल ढिकले यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या सभांना मिळालेला प्रतिसाद मतयंत्रातही कायम राहिल्याने इथे ‘पवार पॉवर’ निर्णायक ठरल्याचे निकालाने अधोरेखित केले.

जळगाव : भाजप जिंकला, पण…

बारा जागा असलेल्या जळगाव जिल्ह्याची निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरती राहिली. भाजपने मुक्ताईनगरमध्ये खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी यांना मैदानात उतरवले होते. तथापि, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्याविरुद्ध शड्डू ठोकलेच, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यातही पाटील यशस्वी झाले. त्याचीच परिणती त्यांच्या विजयात झाली आणि रोहिणी खडसे यांचा धक्कादायक पराभव झाला. भाजप व सेनेने प्रत्येकी चार तर राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षाने प्रत्येकी एका जागेवर झेंडा रोवला. निवडणूकपूर्व कलगीतुरा रंगलेल्या गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या मंत्रीद्वयाचा सहज झालेला विजय हीदेखील जिल्ह्यातील दखलपात्र बाब ठरली.

- Advertisement -

धुळे, नंदुरबार : संमिश्र परंपरा कायम

आदिवासीबहूल समजल्या जाणार्‍या धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत अनुक्रमे पाच व चार जागा आहेत. त्यापैकी धुळे शहरात विद्यमान आमदार अनिल गोटे यांना धूळ चारत एमआयएमच्या फारूख शहा यांनी विजय मिळवला, तर धुळे ग्रामीण राखण्यात काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना यश आले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल (शिंदखेडा) व काशिराम पावरा (शिरपूर) यांनी भाजपचे कमळ फुलवले; तर साक्रीमध्ये अपक्ष मंजुळा गावित यांनी जनादेश मिळवला. नंदुरबार शहरात भाजपच्या डॉ. विजयकुमार गावित यांनी अपेक्षेनुरूप सफाईदार विजय मिळवला. अक्कलकुव्यात अ‍ॅड. के. सी. पाडवी आणि नवापूरमध्ये शिरीष नाईक यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला, तर भाजपच्या डॉ. राजेश पाडवी यांनी शहाद्याचा गड राखला.

एकूणच उत्तर महाराष्ट्राच्या निकालावर दृष्टीक्षेप टाकल्यास भाजप-शिवसेना युतीच्या अपेक्षांचा फुगा फुटला आणि त्यांना मतदारांनी बर्‍यापैकी रोखले. राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिक जिल्ह्याने हात दिला तर आदिवासीबहुल मतदारसंघ आजही काँगेसच्याच कवेत असल्याचे बव्हंशी ठिकाणी दिसून आले.

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)

भाजप 13
शिवसेना 6
राष्ट्रवादी 7
काँग्रेस 5
एएमआयएम 2
अन्य – 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -