घरमहाराष्ट्रघाटकोपरमध्ये प्रबळ विरोधकाचा अभाव; मेहतांना पर्याय कोण?

घाटकोपरमध्ये प्रबळ विरोधकाचा अभाव; मेहतांना पर्याय कोण?

Subscribe

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात सध्या वेगळेच वारे वाहत आहेत. सलग सहा वेळा निवडून आलेले परंतु आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिलेले माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्यासाठी उमेदवारी टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. तर प्रवीण छेडा की पराग शहा यापैकी कोणाला उमेदवारी मिळू शकते याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व असले तरी गुजराती मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात भाजपलाचा पसंती दिली जाते.

मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्प, इमारतीचा पुनर्विकास, नियमबाह्य दिली जाणारी परवानगी आणि त्यातील टक्केवारी याबाबत सातत्याने झालेले विविध आरोप व त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. त्यातच स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याने सलग सहावेळा निवडून आल्यानंतरही त्यांना घाटकोपर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याबाबत शंका उपस्थित होत आहे. मेहता यांच्यासमोर आपली उमेदवारी टिकवण्याचे मोठे आव्हान आले. त्यांच्या उमेदवारीबाबत शंका असल्याने त्यांनी आता आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मेहता किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यास उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल उत्सुकता निर्माण झाली आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघात प्रवीण छेडा व पराग शहांसारखे अनुभवी नेते आहेत. त्याचबरोबर इच्छुकांची संख्याही कमी नाही. भाजपमधून कोणताही उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला तरी त्याच्यासमोर प्रबळ प्रतिस्पर्धी कोण असेल असा प्रश्नही कायम राहतो.

- Advertisement -

घाटकोपर पूर्व मतदारसंघांत गुजराती मतदारांचे प्राबल्य असले तरी यामध्ये मराठी, हिंदी भाषिक नागरिकांचीही संख्या अधिक आहे. पूर्वी या मतदारसंघात मराठी-गुजराती वाद होता. परंतु, आता मराठी भाषकही भाजपला पाठिंबा देत असल्याने हा वाद मागे पडला आहे. शिवसेना व मनसेचे येथे अस्तित्व असले तरी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र लढूनही भाजपला फारसा फरक पडला नाही. तर मनसेचाही मराठी मतदारांवर विशेष प्रभाव दिसला नाही. या मतदारसंघात दलित मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे वंचित आघाडीला त्याचा काय फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण त्यांना विजयाला गवसणी घालणे अवघड ठरणार आहे. उलट वंचित आघाडीमुळे काँग्रेसच्या मतांची फाटाफूट होऊन त्याचा फायदा भाजपलाच अधिक होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून 90 हजारांवर मते मिळाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून तब्बल ९० हजारांवर मतांची आघाडी मिळाली होती. विरोधक प्रबळ नसल्याने मेहता यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांशी असणार आहे. मेहता यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे प्रविण छेडा यांना भाजपने प्रवेश दिला. मेहतांचा एक तगडा विरोधक ही भाजपने आपल्या गळाला लावला. याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. १९९० पासून महेता यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत त्यांना सलग सहावेळा उमेदवारी देण्यात आली. युती सरकारच्या दोन्ही सरकारमध्ये त्यांनी महत्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -