घरमुंबईमुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं उघडणार; शिवसेनेला फटका?

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं उघडणार; शिवसेनेला फटका?

Subscribe

मुंबईतल्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकण्याची शक्यता आहे. इथे शिवसेनेला फटका बसणार असल्याचं चित्र मतदानाच्या एकूण टक्केवारीवरून दिसत आहे.

२०१४च्या निवडणुकांमध्ये अवघ्या १ हजार ७ मतांनी पराभूत होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदा आपली सगळी ताकद पणाला लावून अणुशक्ती नगरमध्ये प्रचार केला होता. त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण अणुशक्ती नगरमध्ये सोमवारी झालेल्या विधानसभा मतदानामध्ये २०१४च्या तुलनेत तब्बल ९ टक्क्यांनी मतदान जास्त झालं आहे. २०१४मध्ये या मतदारसंघात ४६.७४ टक्के मतदान झालं होतं. मात्र, सोमवारी झालेल्या मतदानात हा आकडा थेट ५५.३० टक्क्यांवर गेला आहे. स्थानिक विद्यमान आमदार तुकाराम काते यांच्याविरोधात मतदारांमध्ये असलेली नाराजी या वाढलेल्या टक्केवारीच्या रुपात नवाब मलिक यांच्या खात्यात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुकाराम कातेंविरोधात नाराजी

शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि मनसेचे वैभव रावराणे या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वैभव रावराणे यांचा इथला अल्प वावर पाहाता ही निवडणूक तुकाराम काते आणि नवाब मलिक यांच्यात थेट असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, तुकाराम कातेंच्या कामगिरीबाबत स्थानिकांमध्ये असलेला रोष आणि नवाब मलिक यांनी व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून केलेला प्रचार याचा फायदा मलिकांना आणि तोटा कातेंना होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मतांची टक्केवारी वाढल्यामुळे इथून नवाब मलिक यांचा विजय पक्का मानला जात आहे.

- Advertisement -

वाचा अणुशक्ती नगर मतदारसंघातली राजकीय गणितं!

वाढलेली मतं कुणाच्या पारड्यात?

२०१४मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. त्याच प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील स्वतंत्र लढले होते. यंदा मात्र, हे चारही पक्ष आघाड्यांमध्ये लढत आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपच्या पाठिंब्यामुळे तुकाराम कातेंची ताकद वाढली असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे नवाब मलिक यांचं देखील बळ वाढल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर अणुशक्ती नगरमध्ये चुरशीची लढत झाली असली, तरी ही वाढलेली मतं या मतदारसंघातला अंतिम निकाल ठरवणार असल्याचं चित्र दिसत आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -