घरमहाराष्ट्रसत्ता स्थापनेच्या तिढ्यात मोदींची एंट्री होणार?

सत्ता स्थापनेच्या तिढ्यात मोदींची एंट्री होणार?

Subscribe

नवीन सरकार स्थापन करण्यासाठी अवघे सहा दिवस राहिले उरले आहे. तरी देखील सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाकडून अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. भाजपने १०५ जागा मिळवत मोठा पक्ष झाला असला तरी मागच्यावेळे प्रमाणे शिवसेनेला वगळून त्यांना मॅजिक फिगर गाठणे शक्य नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली असल्याने सत्ता स्थापनेची कोंडी फुटत नाही. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मागच्या आठवड्यात मुंबईत येणार असे सांगितले जात होते. मात्र नंतर त्यांची भेट रद्द झाल्याचे कळले. सत्ता स्थापनेत फडणवीस एकटे पडल्याचे दिसत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सत्ता स्थापनेत पुढाकार घेणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. उद्या दिल्लीमध्ये मोदी-फडणवीस भेट होणार असल्याची माहिती भाजपमधील नेत्याने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बँकॉक दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते भारतात परतणार आहेत. परतल्या नंतर ते महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना तिढ्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान आज संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला आणखी काही खाती वाढवून देता येतील का? यावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्याची माहिती दिल्लीला देण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेट घेऊन पुढील रणनीती ठरविणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

२४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आधीच पत्रकार परिषद घेऊन सत्तेत समान वाटा हवा असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून रोज शिवसेना आणि भाजपमधील नेते सत्ता स्थापनेवरून माध्यमांवर वाद-प्रतिवाद करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर आज शिवसेनेकडे १७५ आमदारांचे पाठबळ असल्याचे वक्तव्य केलेले आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे बोलताना संजय राऊत यांच्या सततच्या वक्तव्यामुळे युतीमध्ये तणाव वाढत असल्याचे सांगितले आहे.

दोन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेची चर्चा सुरुच झाली नसून ती पुढे जाण्याची काहीही चिन्ह सध्या दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ७ नोव्हेंबर पर्यंत सर्वात मोठा पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे न आल्यास इतर पक्षांना आमंत्रण देण्यात येईल, असे म्हणाले आहेत. राज्यातील मतदारांनी महायुतीला बहुमत दिले असतानाही सरकार स्थापन होत नाही, त्यातच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जर लवकरात लवकर सत्ता स्थापन न झाल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, यासाठी आता दिल्लीतून पंतप्रधान मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -