केडीएमसीला रस्ते दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार?

कल्याण-डोबिंवलीतील रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करू लागले आहेत.

corporators aggressive on pothole issue in kalyan

गणेशाचे आगमन विसर्जन खड्ड्यातून झालं. निवडणूक खड्ड्याने गाजली, आता दिवाळीही संपली. पण रस्त्यांचे काम अधुरेच आहे. रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही त्यामुळे रस्ते दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न कल्याण डोंबिवलीकर विचारत आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यंदाच्या वर्षी रस्त्यांचा विषय खूपच गाजला. शहरातील एकही रस्ता खड्डा मुक्त नसल्याने सेलिब्रेटीपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच नाराजी व्यक्त करीत महापालिकेवर टीकेची झोड उठवली. यंदा पाऊस अधिक पडल्याने रस्ते खड्डेमय झाल्याचे प्रशासनाकडून उत्तर देण्यात आली.

दसरा झाला तरी खड्डे कायमच

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. पण गणेशाचे आगमन आणि विसर्जन खड्ड्यातूनच झाले त्यामुळे गणेश भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नवरात्रीपर्यंत खड्डे बुजवले जातील असे सांगण्यात आले. पण दसरा झाला तरी खड्डे कायमच राहिले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने रस्त्याचे काम खोळंबले. ऐन निवडणुकीच्या प्रचारातही खड्डे विषय खूपच गाजला. मनसेने खड्ड्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सोशल मीडियावरही कल्याण डोंबिवलीतील खड्डयाला चंद्राची उपमा देण्यात आली.

खड्ड्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले तरी….

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा लीड खड्ड्यानेच कमी केला. आता आचारसंहिता संपली, दिवाळीची संपली. पण खड्ड्याची अवस्था कायमच आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत खड्ड्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची काम तातडीने होतील का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

काँक्रीट कामाचा श्री गणेशा …

रस्त्यावरील खड्डे अजूनही भरलेले नसले तरीसुद्धा काही भागात काँक्रीट रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कॉक्रीट रस्त्यांसाठी ४५६ कोटींची घोषणा केली होती. त्यातील काही कामांना सुरुवात झाली आहे. महापालिकेत २० वर्ष युतीची सत्ता असतानाही, महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदारांनी पालिका आयुक्तांवर खापर फोडले होते. त्यामुळे आता तरी प्रशासन कामाला लागेल का? याकडे लक्ष वेधले आहे.


हेही वाचा – ‘ढाण्यावाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवोत’; ठाण्यात बॅनरबाजी