घरमहाराष्ट्ररायगडात युती-आघाडीचा गोंधळात गोंधळ!

रायगडात युती-आघाडीचा गोंधळात गोंधळ!

Subscribe

नेत्यांची अटीतटी, कार्यकर्त्यांचे वांदे

शिवसेना-भाजप युतीसह महाआघाडीची अधिकृत घोषणा झाली असली तरी रायगडच्या बहुतेक मतदारसंघांमध्ये युती व आघाडीतील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. युतीमध्ये तर दोन्ही बाजूंनी अर्ज भरण्यात येत असल्यामुळे ही युती खरोखर झाली आहे का, असा सवाल युतीचेच कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागले आहेत.

मंगळवारी भाजपचे पनवेल व पेणचे उमेदवार जाहीर होताच शिवसैनिकांत चलबिचल सुरू झाली होती. बुधवारी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख नरेश गावंड यांचा पेणसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मातोश्रीवरून आदेश आल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात असले तरी गावंड यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे शिवसैनिकांत गोंधळ उडाला. तर पेणमध्ये भाजपकडून रवी पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे काँग्रेसमधील सहकारी छुपी मदत करतील अशी चर्चा सुरू झाली. बुधवारी काँग्रेसने या मतदारसंघात नंदा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे त्या पक्षाचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

- Advertisement -

महाआघाडीत दोन्ही काँग्रेससोबत शेतकरी कामगार पक्ष असून, पेणची जागा शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील हेच लढवणार आहेत. असे असताना काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अलिबागमधून राजेंद्र ठाकूर काँग्रेसमधून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. महाडमध्ये पक्षाने माणिक जगताप यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर केले आहे. उरणमध्ये शेकापचे विवेक पाटील उमेदवार असताना काँग्रेसने तेथून डॉ. मनिष पाटील यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची मते फुटू नये म्हणून मैत्रीपूर्ण लढतीचा हा भाग असल्याची चर्चा आहे. तरी सामान्य कार्यकर्त्यांना मात्र राजकारणातील ही बेरीज-वजाबाकी समजण्यापलिकडे झाली आहे.

उरणमध्ये भाजपचे नेते महेश बालदी यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर शिवसेनेचे विद्यमान आमदार व अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांना लढत जड जाण्याची शक्यता आहे. बालदी हे भाजप नेते व मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आहेत. गडकरी यांचे अनेक निकटवर्तीय तिकीट मिळण्यापासून दूर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील तोच उमेदवार असणार, हे यानिमित्ताने पक्के झाले आहे. म्हणूनच पेणमध्ये रवी पाटील यांना भाजपकडून सेनेचा विरोध डावलून रिंगणात उतरविण्यात आले आहे.

- Advertisement -

अलिबागमध्ये सेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडला असून, सेनेचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. श्रीवर्धनमध्येही सेनेचे विनोद घोसाळकर यांच्या विरोधात भाजपचे कृष्णा कोबनाक लढण्यास तयार आहेत. तिकडे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड हेच पुन्हा रिंगणात उतरणार हे बुधवारी सायंकाळी स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवतील. महाडमध्येही शिवसेनेसोबत भाजपचे पटतेय असे दिसत नसल्याने शिवसेनेचे भरत गोगावले यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. युती एकदिलाने लढल्यास गोगावले विरुद्ध जगताप लढत लक्षवेधी ठरू शकते.

प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली असल्याने शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात रंजक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी युती व आघाडीत बंडखोरीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तूर्त गोंधळात गोंधळ अशीच स्थिती आहे.

रायगडात युती-आघाडीचा गोंधळात गोंधळ!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -