घरमहाराष्ट्रपनवेलमध्ये भाजप-शेकाप खडाखडी !

पनवेलमध्ये भाजप-शेकाप खडाखडी !

Subscribe

भाजपला शिवसेनेचा अपशकून

महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ अशी ओळख बनलेल्या पनवेलमध्ये यावेळी पुन्हा एकदा भाजप व शेकाप आमने-सामने उभे ठाकले आहेत. स्थानिक शिवसेनेने भाजपला येथे अपशकून करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपला फार मोठा फरक पडेल अशी शक्यता नाही. भाजपकडून आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा पक्षाचे जिल्हाध्यक्षही असलेले प्रशांत ठाकूर सर्व शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. त्यामानाने प्रतिस्पर्धी पूर्वीप्रमाणे तुल्यबळ असल्याचे दिसत नाहीत.

पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. जंग जंग पछाडूनही या ठिकाणी काँग्रेसला कधी विजय मिळवता आला नाही. मात्र शेकापचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या पक्षाला काहीसे अच्छे दिन आले. त्यांचे पुत्र प्रशांत ठाकूर यांनी 2009 च्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांचा जवळपास 13 हजारांच्या फरकाने पराभव करून शेकापची विजयी परंपरा खंडित केली. 1962, 67, 72, तसेच 1980 मध्ये दि. बा. पाटील, 1978, 85 व 90 मध्ये दत्तुशेठ पाटील, तर 1995, ९९ व 2004 मध्ये विवेक पाटील या शेकापच्या दिग्गजांनी विजय संपादन केला. 2014 च्या निवडणुकीत रामशेठ ठाकूर परिवार भाजपमध्ये गेल्याने प्रशांत ठाकूर भाजपकडून लढून शेकापच्या बाळाराम पाटील यांचा १३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

- Advertisement -

यानंतर पनवेलमधील राजकीय समीकरणे बरीचशी बदलली. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विवेक पाटील यांनी उरण मतदारसंघाला पसंती दिली, तर बाळाराम पाटील यांना विधान परिषद मिळाली. परिणामी शेकापच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दुसर्‍या फळीतील नेत्यांवर आली आहे. या तुलनेत भाजप या मतदारसंघात बराचसा आक्रमक झाला आहे. महानगरपालिकेची एकहाती सत्ता भाजपकडे असल्याने प्रशांत ठाकूर काहीसे निर्धास्त आहेत. यावेळी त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेने कडाडून विरोध केला खरा, मात्र शिवसेनेची ताकद आजही या मतदारसंघात म्हणावी तितकी नाही, हे उघड गुपित आहे. 2014 च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना १ लाख 25 हजार 142 मते असताना शिवसेनेचे वासुदेव घरत यांना अवघी 17 हजार 953 मते मिळाली होती.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असणारे बबन पाटील यांनी पक्षाकडून अर्ज भरला आहे. मात्र उरणमध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांना भाजपचे नेते महेश बालदी यांनी अपशकून केल्याने त्याचा बदला (!) बबन पाटील घेत आहेत इतकाच त्याचा तूर्त तरी अर्थ लावता येईल. शेकापने नगरसेवक हरेश केणी यांना रिंगणात उतरविले आहे. केणी या मतदारसंघाला तसे नवखे असल्याने प्रशांत ठाकूर यांच्याशी ते कसे दोन हात करतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

- Advertisement -

काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेले कांतीलाल कडू यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. 2014 च्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार आर. सी. घरत यांना फक्त ९ हजार २६९ मते मिळाली असून, घरत हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना पनवेलमध्ये पक्षाची ताकद वाढली असे झाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मतांची अपेक्षा असलेल्या कडू यांना वैयक्तिक संपर्कातूनच मतांची बेगमी करावी लागणार हे उघड आहे.

५ लाखांहून अधिक मतदार असलेला हा मतदारसंघ मुंबईचे नाक आहे. त्यामुळे त्यावर पकड ठेवण्याचा प्रयत्न ठाकूर नक्की करणार! आगरी समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात आज विविध जाती धर्माचेही लोक मोठ्या संख्येने राहतात. सर्व दृष्टीने सोयीस्कर म्हणून राहण्यासाठी पनवेलला पसंती दिलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

2014 निवडणूकः-
प्रशांत ठाकूर (भाजप) 125142
बाळाराम पाटील (शेकाप) 111927
वासुदेव घरत (शिवसेना) 17953
आर. सी. घरत (काँग्रेस) 9269

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -