घरमहाराष्ट्रउरणमध्ये भाजपचा शिवसेनेला ठेंगा!

उरणमध्ये भाजपचा शिवसेनेला ठेंगा!

Subscribe

उरण विधानसभा मतदारसंघात नशीब आजमविण्यासाठी 8 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत अपक्ष (भाजपाचे बंडखोर) महेश बालदी, शेकाप-काँग्रेस आघाडीचे विवेक पाटील आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्यामध्येच होणार आहे. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या, असा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचा आदेश असतानाही बालदी यांनी आपला निर्णय कायम ठेवला असल्याने या मतदारसंघात भाजपकडून शिवसेनेला ठेंगा दाखविला जाणार हे स्पष्ट आहे.

या मतदारसंघात शिवसेना आणि शेकापची पारंपरिक व्होट बँक आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बालदी यांनीदेखील आपली ताकद दखल घेण्याजोगी वाढवली आहे. सेना, शेकापतील नाराज बालदी यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बालदी यांनी आपली उमेदवारी चर्चेत राहील याची खबरदारी घेतली. परंतु युतीच्या तिकीट वाटपात भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने बालदी स्वाभाविक नाराज झाले आणि त्यांनी युतीच्या धर्माला तिलांजली देत अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे भोईर यांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते बालदी यांच्यासोबत उघडपणे, तर काही पडद्याआडून आहेत. यात गमतीचा भाग असा भोईर यांना भाजपा कार्यकर्त्यांशिवाय फक्त भाजपचा झेंडा हाती घेऊन प्रचार करावा लागत आहे.

- Advertisement -

या मतदारसंघात काँग्रेसची निर्णायक मते आहेत. ही मते कोणाच्या पारड्यात पडतात त्यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. या निवडणुकीत शेकाप-काँग्रेस आघाडी असली तरी काँग्रेसचे मतदार बिथरण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेचे उमेदवार भोईर हे भाजपाचा पाठिंबा आपल्याला असल्याचे जाहीर करीत असले तरी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याप्रमाणेच रामशेठ ठाकूर यांचाही पाठिंबा बालदी यांनाच असल्याचे भाजपाचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत. बालदी यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सेना प्रयत्नशील होती, मात्र त्यांना भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांचेच छुपे बळ असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणाही नेत्याचा फोन आला नसल्याचे सांगितले जाते. उलट त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी आणि या मतदारसंघातील तीन तालुकाध्यक्षांनी उपस्थिती दाखविली होती.

दोन दिवसांपूर्वी भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये जाऊन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर उरण मतदारसंघात भाजप भोईर यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बालदी यांनी जे शक्तिप्रदर्शन केले ते कशाचे द्योतक, असा कळीचा मुद्दाही पुढे केला जाऊ लागला आहे. याचवेळी नवी मुंबईसह रायगडमध्ये शिवसेनेबरोबर युती मान्य नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केल्याची आठवण आता बालदी समर्थक आवर्जून करून देत आहेत.

- Advertisement -

या मतदारसंघात विवेक पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार असताना खरी चर्चा बालदी आणि भोईर यांच्या उमेदवारीचीच असल्याने येत्या आठ दिवसांत स्थानिक राजकारणात कोणकोणते रंग भरले जाणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -