‘कोरोना व्हायरस म्हणजे बायकोसारखा आहे…!’

Jakarta
coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

आख्खं जग एकीकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दुसरीकडे इंडोनेशियाचे गृहमंत्री मात्र कोरोनाला बायकोची उपमा देत आहेत. त्यामुळे इंडोनेशियन जनतेसोबतच सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. इंडोनेशिया हा जगातला चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. इंडोनेशियामध्ये आत्तापर्यंत २६ हजार ४७३ कोरोनाचे रुग्ण सापडले असून १६१३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या इंडोनेशियामधलं वातावरणं भितीयुक्त संकटाच्या छायेत असताना त्यांच्या गृहमंत्र्यांनीच अशा प्रकारचं वक्तव्य करणं तिथल्या जनतेसोबतच महिला सक्षमीकरण संघटनांना देखील रुचलेलं नाही.

नक्की काय म्हणाले गृहमंत्री?

इंडोनेशियाचे गृहमंत्री मोहम्मद मेहफूद यांनी देशवासियांशी नुकताच ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना मेहफूद यांनी त्यांना मोबाईलवर आलेला एक मीम वाचून दाखवला. मेहफूद म्हणाले, ‘आपण कायमस्वरूपी असेच घरात बंदिस्त राहणार आहोत का? तर आपण समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. पण ते करतानाच आपल्या आरोग्यावर देखील लक्ष ठेवावं लागेल. मला या स्थितीवर एक मीम मोबाईलवर आला होता. त्यात म्हटलं होतं, कोरोना हा आपल्या बायकोप्रमाणेच आहे. सुरुवातीला तुम्ही त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता. पण कालांतराने तुम्हाला जाणीव होते की ते शक्य नाही. मग तुम्ही त्याच्यासोबत जुळवून घेता’.

मेहफूद यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. इंडोनेशियन महिला सक्षमीकरण गटाच्या प्रमुख डिंडा निसा युरा यांनी तर हे वक्तव्य लिंगभेद करणारं असल्याचं म्हटलं आहे. ‘हे वक्तव्य इंडोनेशियन सरकार का कोरोनाला हरवू शकलेलं नाही त्याची साक्ष पटवणारं आहे. सरकारी अधिकारी आणि नेत्यांचा लैंगिक भेदभाव करणारा दृष्टीकोण या वक्तव्यातून जाहीर होतोय’, असं त्या म्हणाल्या.