घरफिचर्ससारांशस्मृतीप्रियेचं वाहतं गाणं

स्मृतीप्रियेचं वाहतं गाणं

Subscribe

पहिल्या काही पुरात मोठमोठी लाकडं वाहून यायची. ही लाकडं पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली जायची. ज्याने लाकूड काठावर आणलं त्यांवर मालकी त्याची. या लाकडावर नंतर बोली लावली जायची. पुरानंतर नदीचं अंतरंग ढवळून निघे. बरेच डोह रेती गाळात सपाट होत तर कुठे सपाट भागाचा डोह बने. पुराआधीची नदी पुरानंतर बदललेली असायची. पुरात मासोळ्यांचं नृत्य पाहणं ही पर्वणीच असते. पक्ष्यांचे थवे जसे आकाशात स्वच्छंदी विहार करतात तशाच या माशांच्या टोळ्या प्रवाहाच्या विरुद्ध नाचत मनसोक्त उड्या मारत आनंद लुटतात.

मातीइतकीच नदी पावसाची वाट पाहते. पाऊस मातीसह नदी गाठतो. नदीला घट्ट मिठी मारतो. तिच्यात आकंठ डुंबून राहतो. तिचा तळ-काठ ढवळून निघतो आंतर्बाह्य. आपण म्हणतो नदीला पूर आला. पुरातून नदी न्हावून निघते. पहिलं न्हाणं येऊन गेल्यावर कुवार पोरीच्या उजळ कांतीसारखी नदीची कळी खुलते. ती सर्वांग सुंदर होते. प्रत्येक पुरानंतर तिच्या चर्येवर आभाळभर समाधान लख्खं दिसून येतं. माणसं पावसाळे अनुभवत शहाणी होतात तर पुरांचा भोग नदीच्या शहाणीवेत असतो. ती वाहतेय अनंत काळापासून निरंतर. काठावरच्या मानवी संस्कृतीला समृद्ध करत. तिचं मूळ शोधायला निघालेला परतला नाही अजून. ती अगाध आणि अमर्याद आहे. तिच्या तळाशी नदीप्रेमींच्या स्मृतींचा झरा आहे. नदी स्मृतीप्रिया. या स्मृतीप्रियेचं वाहतं गाणं आहे पूर. आपल्यासाठी नदी तसाच नदीसाठी पूर.

वाघूरला पूर आला म्हणजे नदीकाठच्या गावांसाठी उत्सवच असायचा. कडगावला आमचं घर नदीकडेच एका कराडीला होतं. घरातून नदी दिसायची. या कराडीला हाम्ता असं नाव होतं. हा हाम्ता म्हणजे हनुमंताचा अपभ्रंश. हनुमंताच्या देवळासमोरचा हा भाग होता. नदीकडे जाणारी वाट आमच्या हाम्ताखालून जायची. आमचं घर म्हणजे कुडाच्या भिंती आणि त्यावर टिनाचे पत्रे. या पत्रांवर पडणार्‍या पावसाच्या एकंदरीत सर्वच लहरी-राग-रंग परिचयाचे होते. पावसाच्या या खेळावरून नदीला पूर केव्हढा येईल याचा अचूक अंदाज आम्ही भावंडे खाटेवर अंथरुणात पडून बांधायचो. सकाळी बाबा पुराचा चहाळ घेवून मला उठवायचे. दुथडीभरून वाहणारी वाघूर पाहून मनही भरून वाहायचं. पोरं ‘नदीला पानी आलं रे’ म्हणत गल्लीभर दिंडोरा पिटायचे. पूर पहायला आमच्या घराजवळ गावकर्‍यांची गर्दी जमायची. कधी कधी मी अंथरूणातूनच बाबांना विचारायचो, देवाचं पानी केव्हढं झालं रे बाबा राती? आन पूर केव्हढा आलाहे? बाबा प्रत्येक पुराचं इत्यंभूत वर्णन सांगायचे ‘फरशीच्या वरे पानी गेलं’; ‘झेपचा दगड बुजाला’; ‘नावच्या दगडाला घेर पडला’; ‘गोठाणाची नाळ फुटली’. हे ऐकून फार गंमत वाटे. मग हळूहळू कळायला लागलं की ही आपल्या वाघूरकाठच्या लोकांचे पाऊस आणि पूर मोजण्याचे एकक आहेत. पूर्वजांनी पुराच्या मापलेल्या या खुणा आहेत. नदीवरच्या पुलाला फरशी म्हणूनच ओळखतात. फरशी पाण्याखाली गेली म्हणजे पारच्या वावरात कुणी जाऊ शकत नव्हतं हे त्यातून सूचित होत होतं. नदीच्या मधोमध एक काळा पाषाण होता त्याला झेपचा दगड म्हणायचे. झेप म्हणजे थांग. हा झेपचा दगड बुडला म्हणजे पुरात कुणीही झेप टाकू नये असा संकेत होता. अजून एक नावेच्या आकाराचा महाकाय दगड होता-हाच ‘नावचा दगड’ पुराने वेढला म्हणजे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे असा इशारा होता. गावातले गुराखी आपलं गव्हरं नदीकाठी जिथे एकत्र जमायची ते गोठण. या खोलगट भागात पुराचे पाणी तुडुंब भरून उताराकडून ओसांडून वाहू लागलं की गोठाणाची नाळ फुटली असं गावकरी म्हणत. अशावेळी कुणीही आपली गुरं गोठाणाकडे नेत नसत.

- Advertisement -

पूर पाहायला दिवसा लोकांची गर्दी जमे. नदीचं हे भरतं पाहणारी वेडी माणसं जशी होती तशी पुरात पोहणारी जिगरबाज माणसांचीही गावात कमी नव्हती. पहिल्या काही पुरात मोठमोठी लाकडं वाहून यायची. ही लाकडं पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली जायची. ज्याने लाकूड काठावर आणलं त्यांवर मालकी त्याची. या लाकडावर नंतर बोली लावली जायची. पुरानंतर नदीचं अंतरंग ढवळून निघे. बरेच डोह रेती गाळात सपाट होत तर कुठे सपाट भागाचा डोह बने. पुराआधीची नदी पुरानंतर बदललेली असायची. पुरात मासोळ्यांचं नृत्य पाहणं ही पर्वणीच असते. पक्ष्यांचे थवे जसे आकाशात स्वच्छंदी विहार करतात तशाच या माशांच्या टोळ्या प्रवाहाच्या विरुद्ध नाचत मनसोक्त उड्या मारत आनंद लुटतात. पहिल्या पुराच्या गढूळ पाण्यात मासे धरायला खूप गर्दी असायची. अगदी सहज पाण्यात हात घातला की मासे लागत. याला मेनेन लागलं असं म्हणायचे. मासे खाणारांची तेव्हा चंगळ असे. मासे खावून कंटाळलो की पुरसानात खेकडे पकडायचो. पूर ओसरल्यावर काठांवर जो कचरा जमतो त्याला आम्ही पुरसान असं म्हणायचो. पुरसान माझ्यासाठी खजिनाच होता. इथेच मला रानमेवा, काच, प्लास्टिक, रबराच्या वस्तू, खेळणी मिळत. माझ्या अनवाणी पावलांना पहिल्यांदाच चपला-बूट याच पुरसानात मिळाल्या. शिवाय मुबलक सरपणही येथे मिळे. गुरांना चराईत सोडून दिलं की मी पुरसानाचं उत्खनन करणं माझं आवडतं काम.

आसपास पाऊस नसला तरी बर्‍याचदा सातपुड्यात किंवा मध्य प्रदेशात जोरदार पाऊस झाला की तापीला मोठा पूर यायचा. तापी-वाघूर संगम जवळच असल्यामुळे हा पूर वाघूर नदीत उलट्या दिशेनं गावाकडे यायचा. दोन्ही नद्यांना पूर असला की वाघूरचं पाणी तुंबत असे. या तुंबलेल्या पुराला ‘ऊसु’ म्हणायचो. बाबांनी ऊसु आलाय हे सांगितलं की मी तडक अंथरूणातून उठून ‘हाम्ताकडे’ जायचो. हनुमंताच्या देवळाजवळून वाघूरचं देखणं रूप मनभरून न्याहाळता यायचं. ऊसु म्हणजे आमच्यासाठी समुद्रच. सर्वदूर पाणीच पाणी. अनेकदा ऊसु की गावाला वेढा घालायचा. लेंडीनाल्यातल्या वडाच्या शेंड्याला पाणी भिडू नये म्हणून लोक या नद्यांना नवस बोलत. कारण वडाचा शेंडा बुजला म्हणजे अख्ख गाव बुडेल अशी भीती असायची. हाम्ताखाली आलेलं ऊसुचं पाणी लोक मारुतीला वाहायचे आणि नदीची खणा-नारळाने ओटी भरायचे. पावसालाही साकडं घालायचे. असा मोठा ऊसु आला की बाबा आम्हाला बहात्तर साली आलेल्या पुराच्या आठवणी सांगायचे. ऊसुत दोन नद्यांचे प्रवाह असतात. पाणी सर्वत्र संथ वाटत असलं तरी तळात मोठी खडबड सुरू असते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तराफा, भोपळा, प्लास्टिकच्या कॅन आदींचा नदी पार करण्यासाठी वापर व्हायचा.

- Advertisement -

दिवसा दूर कुठे जोरदार पाऊस पडला की अचानक पूर यायचा. आधीच नदी दुथडी भरलेली असल्यामुळे कुणालाही नदीतून बाहेर पडायला वेळ मिळायचा नाही. अशा अचानक आलेल्या पुराला जीप म्हणत. या जीपने गावातल्या काही माणसांचा -जनावरांचा जीवही घेतला आहे. ऐन संध्याकाळी घरी परतताना पूर आला की आम्ही गुराखी गुरं पुरात हाकलून त्यांची शेपटी घट्ट धरून इकडच्या पार यायचो. वावरात मजुरीला गेलेल्या बाया माणसं मात्र रात्रभर पूर ओसरायची वाट पाहात बसायचे. इकडच्या काठावरून तिकडच्या लोकांना मोठमोठ्याने ओरडून निरोप दिला जायचा. काही माणसं तराफा किंवा ट्यूबवर पूर पार करून लोकांना भाकरी घेवून जायचे. पलीकडच्या गावातले लोक आमच्या गावात मुक्काम करायचे. त्यांना गावातून पाहुणचार आणि पांघरूण मिळे. पलीकडे अडकलेल्या आमच्या गावकर्‍यांचा पाहुणचार तिकडच्या गावात होई. नदीने अशी गावं-गावं माणसं-माणसं-मनं-मनं जोडलेली होती. आज हरवलंय नदीचं वाहणं पण या स्मृतीप्रियेचं वाहतं गाणं सुरुये आणि ते गुंजत राहील शतकानुशतके अविरत.

नामदेव कोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -