Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ...आम्ही चालवू हा पुढे वारसा!

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ…आम्ही चालवू हा पुढे वारसा!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागील तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून, संघटितपणे चाललेले हे समाज परिवर्तनाचे प्रमुख काम, महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात समाजापुढे येणे, त्याची तोंडओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या पुढील लेखांमध्ये समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कोणकोणते काम, कसकसे होत गेले, झाले. प्रत्यक्ष काम करीत असताना कार्यकर्त्यांना कोणकोणते अडथळे आले, कशाप्रकारे संघर्ष करावा लागला, त्याचे चांगले-वाईट परिणाम काय झाले, पुढील आव्हाने कोणकोणती आहेत. समाजातील सर्व स्तरातील मानवी घटकांना विशेषतः युवा पिढीला, महिलांना प्राधान्य देऊन, हे काम संघटितपणे ग्रामीण,आदिवासी भागात अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे. त्याचा आढावा पुढील काही लेखांमध्ये घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

Related Story

- Advertisement -

अंधश्रद्धा या अज्ञानाचा, अगतिकतेचा भाग असतात, सृष्टीतील घडामोडींचे नियम ज्ञात झालेले नसतात, समाजव्यवस्था जन्मसिद्ध विषमतेवर आधारलेली असते आणि ही परिस्थिती दूर करण्यासाठी विज्ञानाचा व अद्ययावत कालोचित मूल्यभावांचा आधार घेतला जात नाही, तेव्हा अंधश्रद्धा निर्माण होतात आणि बळावतात. अंधश्रद्धा माणसाला दुबळा आणि अगतिक बनवतात. त्याची चिकित्सक बुद्धी आणि विवेकशक्ती नष्ट करतात. हळूहळू माणूस मानसिक गुलामगिरीत अडकत जातो. अन्य प्राण्यांपेक्षा माणूस शारीरिकदृष्ठ्या दुबळा आहे. तरीही, अन्य प्राण्यांना न साधलेली भौतिक प्रगती त्याने साध्य केली आहे, ती केवळ त्याच्या बुद्धीच्या आणि चिकित्सा वृत्तीच्या जोरावर! माणूस अंधश्रद्ध आणि अवैज्ञानिक झाला तर एकूणच समाजाच्या प्रगतीचा ओघच खुंटेल. आजपर्यंतच्या मानवी इतिहासात असे लक्षात आलेले आहे की, वैज्ञानिक जाणिवांचा विकास हेच मानवाच्या प्रगतीचे सूत्र आहे. प्रत्येक घटनेमागे कारण असते आणि ते केवळ माणसाच्याच बुद्धीला समजू शकते. सर्वच घटनांमागील कारणं आज समजली नसली तरी ती जेव्हा केव्हा समजतील त्या पद्धतींचाही उलगडा त्या त्या वेळी होत जातो. हेच ते सूत्र आहे.

समाजातील विचार-चालीरीती यांची निर्मिती, त्यामधील बदल किंवा त्यांच्या बदलाला विरोध हे समाजाच्या त्यावेळच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रामुख्याने अवलंबून असतात. विचारांचे-आचारांचे सातत्याने परखड मूल्यमापन केले नाही तर अंधश्रद्धांचा प्रभाव वाढू लागतो. ज्यांना आज आपण अंधश्रद्धा म्हणतो त्यांच्या निर्मितीमागे त्या काळाच्या संदर्भात माफक विज्ञान व लोकांचे भले करण्याची प्रेरणा असू शकेल. पण मानवजातीचे ज्ञान वाढत गेल्यानंतर आणि समाज बदलत गेल्यानंतर एका टप्प्यावरील विज्ञान दुसर्‍या टप्प्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा ठरतात. त्यासाठी प्रगतीची चढती कमान आणि समाजजीवनाचे प्रवाहित्व लक्षात घेता, श्रद्धा -अंधश्रद्धांच्या चिकित्सेच्या बाबतीत नेहमीच खुले आणि मोकळे असणे आवश्यक असते. जगातील देशांचा इतिहास हेच दाखवतो की, स्वतंत्र चिंतन,अवलोकन, अनुभूती व त्या आधारे ज्ञान यांना ज्या प्रमाणात, ज्या क्षेत्रात अवसर मिळतो, त्याप्रमाणात त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. मात्र हे स्वतंत्र चिंतन, संशोधन ज्याकाळात थबकलेले असते तो काळ हे तमोयुग असते. चौथ्या दशकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये ही स्थिती होती.

- Advertisement -

अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हायला पाहिजे, याविषयी कोणाचेच दुमत होणार नाही. भारतात अंधश्रद्धा निर्मूलनाची परंपरा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातही या कार्याला संपन्न परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील पहिले महत्वाचे प्रबोधन म्हणून संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याकडे आपल्याला बघावे लागते. बाराव्या-तेराव्या शतकात मराठी संतांनी केलेली धर्मचिकित्सा व अंधश्रद्धाविरोधी केलेली जागृती हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न होता, असे आपण ठामपणे म्हणू शकतो. अज्ञानी, अगतिक समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाणे ही अंधश्रद्धा निर्मूलनाची पहिली पायरी असते.

‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ ही तर संतांची प्रतिज्ञाच होती आणि त्यादृष्टीने त्यांनी कीर्तन व प्रवचनांच्याद्वारे धार्मिक प्रबोधनाचे कार्य सातत्याने चालू ठेवले. सतराव्या शतकात संत तुकाराम व इतर अनेक महान संतांनी अंधश्रद्धांचा वेळोवेळी निषेध केला. त्यांच्याविरोधात झोड उठवली. त्यासाठी आपली काया, वाचा, लेखणी झिजवली.

- Advertisement -

इंग्रज काळातील समाजसुधारकांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा आपला महत्वाचा कार्यक्रम मानला. विविध धर्मातील जुनाट आणि वेडगळ समजुतींच्या विरोधात त्या त्या धर्मातील अनेकांनी सडेतोड भूमिका घेतल्या. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी अंधश्रद्धांवर घणाघाती हल्ले केले. त्यांच्या मतें, ईश्वराने मनुष्यास बुद्धी देऊन इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले आहे. मनुष्यास विचारशक्ती आहे. वाचा आहे. तो बर्‍या-वाईटातला फरक करू शकतो. म्हणून सार कोणते व असार कोणते, हे त्याने ओळखले पाहिजे. असे जर झाले तर जुन्या चालीरिती मागे पडतील. त्यांची निरर्थकता जाणवेल. ज्ञान हाच पराक्रम आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला. ‘आगम प्रकाश’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी, याचे परिणामकारक वर्णन केलेले आहे.

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर म्हणतात, ‘ध्यानात ठेवा, ज्ञान आणि विज्ञान, विचार आणि अविचार, आंधळेपणा व डोळसपणा, दुराग्रह आणि दुराभिमान यांच्या झगड्यात अखेरीस तुमच्यासारख्यांची विटंबना, पराभव आणि निराशाच होते. वेळच्या वेळी शुद्धीवर आलात तर फजित न पावता, जगातून आनंदाने निघून जाल. म्हणून वेडा हट्ट सोडून द्या. बदलत्या समाजाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. याप्रमाणेच पूर्वजन्म, पूनर्जन्म, ऐश्वर्या, आत्मा, कैलास, स्वर्ग, वैकुंठ, पाताळ, यम वगैरे काल्पनिक वस्तू आहेत. अशा अंधश्रद्धांना कोणताही आधार नाही. असे आगरकरांनी ठामपणे म्हटले आहे. देवतेपुढे बकर्‍याचे बलिदान करणार्‍या माणसाने आपल्या एखाद्या नातलगाचा बळी द्यायला काय हरकत आहे, असा कठोर प्रश्न आगरकरांनी विचारला आहे.

‘असा कसा तुमचा देव, घेतो बकर्‍याचा जीव’ असा परखड प्रश्न गाडगेबाबांनी उभा केला होता. कीर्तनातून जनसामान्यांशी संवाद करत, धर्मचिकित्सा कशी करावी, याचे उत्तम उदाहरण गाडगेबाबांनी थेट कीर्तनातून उभे केलेले आहे. महात्मा फुले यांनी अनेक उदाहरणांतून कार्यकारणभावाचा मुद्दा स्पष्टपणे मांडला आहे.

‘जप अनुष्ठाने पाऊस पाडिती ।
आर्य का मरती जळावीण।’

किंवा प्रत्येक लढाई मुहूर्तावर लढणारी पेशवाई का बुडाली आणि कोणतीही लढाई मुहूर्ताशिवाय लढण्यासाठी बाहेर पडणारे गोरे साहेब का जिंकले, असा प्रश्न जोतीरावांनी विचारला आहे. समाजात बुवाबाबांची पैदास कशी होते, याचे मर्मग्राही विवेचन जोतीरावांनी ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या पुस्तकात केलेले आहे. त्यांचे स्पष्ट मत होते की, जगातील प्रत्येक धर्मग्रंथ हा त्या त्या विशिष्ट काळातील निर्मिती आहे. त्यातील सत्य हे कधीच त्रिकालाबाधित असू शकत नाही. म्हणून प्रत्येक धर्मग्रंथ हा तर्क, विवेक आणि समतेचे तत्व या निकषांवर तपासला पाहिजे. अशी शिफारस जोतीरावांनी केलेली आहे. भाराभर धर्मग्रंथ हेच या समाजातील अंधश्रद्धांचे मूलस्रोत आहेत, याबद्दल त्यांना शंका नव्हती. ‘सत्यशोधक समाज’ स्थापनेमागे अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांचा मुख्य हेतू होता, असे दिसून येते. शेकडो वर्षांपासूनची मिथकांची समाजमनावरील पकडही त्यांनी सतत सडेतोड प्रतिवाद करून, दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी शाहू महाराज निरीश्वरवादी होते. पण त्यांना अभिप्रेत असणारी श्रद्धा आणि धर्म, मानवतावादी व परमसहिष्णू होते. मूर्तिपूजा, भिक्षुकशाही, दलाली यांना विरोध करणारा, सर्व माणसांना समान लेखणारा व जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारा धर्म त्यांना हवा होता. म्हणून त्यांनी धर्माला रूढी, परंपरा आणि कर्मकांड यापासून मुक्त करण्याचा, शुद्ध मानवतावादी आशय शोधण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला होता.

जातिभेद, वर्णवर्चस्व, कर्मकांडावर आंधळी श्रद्धा व त्यातून निर्माण झालेली अनैतिकता यावर राजर्षी शाहू महाराजांनी घणाघाती प्रहार केले. अतींद्रिय ज्ञान हा धार्मिक भावनेचा आणि अध्यात्माचा आधार असतो, त्याचा पायाच उखाडणारा युक्तिवाद स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला. धर्मग्रंथात जे लिहिलेले असेल ते प्रत्यक्ष प्रमाणाने, निरीक्षणाने, अनुभवाने, प्रयोगाने सिद्ध झाले असेल तरच ग्राह्य धरावे, असा सावरकरांचा आग्रह होता. ‘निरीश्वरवादी धर्म असू शकतो,’ ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठामपणे सांगितली. श्रीकृष्ण म्हणतात, मी देवांचा देव आहे. ख्रिस्ताने सांगितले, मी देवाचा पुत्र आहे, मोहम्मद पैगंबर स्वत:ला देवाचा प्रेषित, असे घोषित करतात. मात्र बुद्धाची भूमिका ही मार्गदर्शकाची आहे आणि बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही धर्मचिकित्सा, धर्म या शब्दाचा क्रांतिकारी अर्थ मांडते. लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सावरकर, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा सर्व समाजसुधारकांच्या धर्मसुधारणेच्या मांडणीत, माणसाचे हित साधण्याचे एक प्रभावी साधन म्हणून ‘मानवी बुद्धीवरील विश्वास’ हाच दिसून येतो.

तेरावे शतक ते सतरावे शतक आणि इसवी सन 1923 ते 1973 या दीडशे वर्षात, महाराष्ट्रात ज्या संत-समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बंड पुकारले, कृतिशील विचारसरणीचा भरभक्कम वारसा आपल्याला दिला दिला आहे, त्यातील काहींचा केवळ नामोल्लेख व त्यांनी केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचंड कामाचा अति संक्षिप्त शब्दात फक्त उल्लेख वर आला आहे. त्यामागे त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याप्रतीची विनम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे तसेच वाचकांना त्यांचे या विषयाबाबतचे विचार वाचण्यास प्रवृत्त प्रेरित करणे, हा नम्र हेतू आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन हे व्यापक समाज परिवर्तनाचे एक प्रमुख अंग आहे. समाजपरिवर्तनाची शिक्षण, राजकारण आणि प्रसारमाध्यमे ही तीन प्रमुख साधने आहेत. साहजिकच अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रत्यक्ष काम करताना, कधी कधी या प्रमुख तिन्ही साधनांचा एकाच वेळी विचार आणि वापरही करावा लागतो. मात्र हे काम करीत असताना ‘माणूस’ हाच सतत केंद्रस्थानी असावा लागतो, ठेवावा लागतो. तरच कामात सुकरता आणि कामाला समाजमान्यता मिळते.

माणसाच्या जाणिवा ह्या कुटुंब, शिक्षण व्यवस्था व समाजव्यवस्था अशा संस्थांमध्ये घडत असतात. आपल्याकडे ह्या तिन्ही संस्था माणसांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्याच्या दृष्टीने सदोष आहेत. जिज्ञासा वाढावी, चिकित्सक वृत्ती तयार व्हावी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जोपासला जावा असे वातावरण या तीनही संस्थामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे प्रयत्न होत नाहीत. ‘का’ हा प्रश्न विचारायला आणि कार्यकारणभावाचा शोध घेणार्‍या तर्कशुद्ध दृष्टीने घटनांकडे बघायला, आपल्या समाजात अनेक वेळा विरोधच होत असतो. अजूनही आपल्याकडे कुटुंबात एकाधिकारशाही आणि तीही पुरुषप्रधान व पितृसत्ताक आहे.

शिक्षणातून तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धती अभावानेच शिकवली जाते. जिज्ञासू वृत्तीचा किंवा कार्यकारणभाव शोधणार्‍या विज्ञाननिष्ठ दृष्टीचा संस्कार शिक्षणातून, मूल्यशिक्षणातून जाणीवपूर्वक समाजात रूजविला जात नाही. मग वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणार कसा ?

भारतीय राज्यघटनेच्या ‘भाग चारमधील कलम 51 क’ मध्ये भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून, जी काही कर्तव्ये सांगितली आहेत, त्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, हे भारतीय नागरिकाचे महत्वाचे कर्तव्य नमूद आहे. तरीपण विविध धर्मांचे गुरु, प्रेषित अध्यात्माच्या नावाखाली जे मेळावे, संमेलने, यात्रा, जत्रा अशा प्रकारांचे आयोजन करतात आणि त्यामध्ये विज्ञान साहित्य -साधनांचा पुरेपूर वापर करून घेतात, मात्र अनेक अवैज्ञानिक गोष्टीच लोकांच्या डोक्यात भरतात, त्यामुळे राज्यघटनेत सांगितलेले मूलभूत कर्तव्य दुर्लक्षित राहते. साहजिकच समाजात मोठ्या प्रमाणात धार्मिक असहिष्णुता, अंधश्रद्धा बोकाळतात, असे आपण पाहतो. खरंतर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा फायदा हा आहे की, त्यातून अचेतन सृष्टीच्या गुणधर्मांची ओळख होते, त्याद्वारे आत्मविश्वास वाढतो, मनोव्यापार निर्भय होतो, मानसिक दहशत संपुष्टात येते आणि त्यामुळे आयुष्याची बौद्धिक व भावनिक प्रत वाढते. हे आज शिक्षणात व समाजात दिसून येत नाही वा संस्कारित होत नाही. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासारखे संवेदनशील व जोखमीचे काम अगत्याने हाती घ्यावे लागते.

भारतीय समाज हा गतानुगतिक असून, जातिव्यवस्थेमुळे शतखंडित झालेला आहे. समाजात अस्तित्वात असलेली आर्थिक आणि सांस्कृतिक दरी भयावह आहे. साहजिकच समाजातील दुर्बल घटकांना ती अंधश्रद्धांकडे ढकलते. मानसिक गुलागमगिरीत आणि दहशतीत जखडते. जुनी कालबाह्य मूल्ये, आजही समाजात टिकून आहेत. कालबाह्य प्रथा, रूढी, परंपरांना, कर्मकांडांना, मूल्यांना चिकटून राहण्यातच समाज आजही धन्यता मानतो. वैज्ञानिक मनोवृतीला विरोध केल्यामुळे, ‘बाबा वाक्यं प्रमाण’ या वृत्तीमुळे, नवविचारांना मनाची कवाडे बंद केल्यामुळे, विचार-रितीरिवाज यांची परिवर्तनीयता नष्ट झाल्यामुळे, धर्माचा समाजजीवन-राजकारण यावर प्रभाव असल्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होतात, वाढतात आणि टिकून राहतात. या प्रक्रियेला समाजातील विषमता, तणाव वगैरेमुळे मोठा हातभार लागतो. समाजात सतत नवीन नवीन विचार मांडले जावयास हवेत. नवीन विचारांसाठी मनाची कवाडे उघडी असावयास हवीत. जीवनाच्या एका टप्प्यावर एखादा विचार शास्त्रशुद्ध वाटला आणि ज्ञानाचा नव्या टप्प्यावर जर तो विचार अशास्त्रीय वाटला तर तो टाकून दिला पाहिजे आणि हेच आचार, रितीरिवाज यांना लागू आहे. असे झाले नाही तर, अंधश्रद्धांची निर्मिती होण्यास वेळ लागत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य बुद्धिप्रामाण्यवादाची बैठक घेऊनच करावे लागते. मागच्या जन्मातील पाप, पुण्यानुसार सध्याचा जन्म मिळाला आहे, त्याचे भोग जो तो त्यानुसार भोगत आहे आणि पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी आत्ताच पुण्यकर्म करा आणि ते पुण्यकर्म काय तर, ऐपत आणि आवश्यकता नसतानाही अनेक निरर्थक, दैवी कर्मकांडे करण्यासाठी भीती, लालच दाखवणे सुरू असते. याला कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. पूर्वजन्म, पुनर्जन्म अशी काही घटना विज्ञानाला अजून तरी आढळून आलेली नाही. पण समाज मात्र अशा निखालस थोतांडांवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून असतो. त्यामुळे जाती जन्मजात असतात, दारिद्य्र हा नशिबाचा भाग आणि भोग असतो अशा वेडगळ कल्पना माथी मारल्या जातात आणि असे एकदा मानले की स्वतःच्या दुःस्थितीची सामाजिक कारणे शोधण्याची गरज राहत नाही. विषमतेविरुद्ध किंवा जाती व्यवस्थेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या लढ्यांमध्ये प्राणपणाने उतरावे, असे आपल्याला वाटत नाही .त्याचे कारण हेच आहे. ज्या संतांनी जडतेला व अज्ञानाला विरोध केला त्यांना समाजातील ‘जडता ’वाढविण्याचे साधन बनवले जात आहे.

ज्या संतांनी चमत्कारांना विरोध केला, त्यामागील सत्यता उघड केली, त्यांच्या भोवतीच चमत्कारांचे वलय निर्माण केले जात आहे. संपूर्ण अध्यात्म हे कर्मकांड आणि अवैज्ञानिक बाबी यांच्या विळख्यात वेढले गेले आहे. नीतीशी फारकत घेणारा जड, बंदिस्त धर्म मध्ययुगात समाजात फोफावला होता. आजही आपल्या समाजाची स्थिती तशीच आहे. अंधश्रद्धा कायम राहण्यात, ज्यांचे आर्थिक वा तत्सम हितसंबंध गुंतलेले आहेत, असा मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे. पण याशिवाय काही जातीय आणि राजकीय शक्ती धर्माच्या नावाखाली धर्मांधता आणि अंधश्रद्धा यांना खतपाणी घालत आहेत. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती दैवी गुणांचे व अलौकिकतेचे वलय निर्माण करून, स्वतःचे व्यक्ती महात्म्य वाढवण्याचे रीतसर प्रयत्न आजही जोरात होत आहेत. जातिभेद, धर्मभेद, कडव्या प्रांतिक अस्मिता यात आजचा समाज विभागला गेलेला आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन करणे, हे कधी नव्हे एवढे आवश्यक झाले आहे.

अंधश्रद्धां बाबत आजची आपल्या समाजातील स्थिती काय आहे ?
समाजातील अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन व्हावे, निदान काही प्रमाणात तरी काही अनिष्ट ,अघोरी, घातक अंधश्रद्धांचे प्रमाण कमी व्हावे, समाजात त्याबाबत जनजागरण व्हावे, होत रहावे यासाठी अनेक संत, समाजसुधारकांनी सामाजिक चळवळीचा पोटतिडकीने, प्रसंगी समाजाचा रोष पत्करून, हालअपेष्टा सोसून, समर्पित भावनेने आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या कृतिशील विचारसरणीचा वारसा काही व्यक्ती ह्या व्यक्तिगत स्वरूपातील कामातून आणि काही संघटना संघटितपणे आजही चालवीत आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी निश्चित ध्येय, उद्दिष्टाने प्रेरित संघटना ,संघटितपणे हे काम मागील तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रात करीत आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दूरदृष्टी व कुशल नेतृत्वाच्या आणि प्रभावी संघटन कौशल्यातून उभी राहिलेली आहे. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ त्यांच्या निर्घृण खुनानंतरही, संघटनेचे सध्याचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अभ्यासू व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली वाढली आणि विस्तारली आहे.

विवेकी व्यक्ती घडविणे आणि विवेकी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करणे, ह्या प्रमुख ध्येयासह, पुढील काही निश्चित उद्दिष्ठ्ये सतत डोळ्यापुढे ठेवून कार्यकर्ते स्वतःचे तन, मन, धन व वेळ देऊन संघटितपणे काम करीत असतात. सर्व जातिधर्माच्या कार्याकर्त्यांचे हे संघटन असून हे कार्यकर्ते, दरवर्षी शेकडो भोंदूबुवांचा पर्दाफाश, भांडाफोड करण्यात यशस्वी होत असतात. म्हणून ‘बुवाबाजी विरोधी संघर्ष ’हे समितीचे वैशिष्ठ्यपूर्ण काम ठरले आहे. जनसामान्यात विशेषतः या कामाच्या नावानेच समितीला नावलौकिक प्राप्त झाला आहे.

भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार आणि अंगीकार करणे, यासाठी समिती अगदी सुरुवातीच्या काळापासूनच महाराष्ट्रातील हजारो शाळा-महाविद्यालयातून तसेच जाहीर कार्यक्रमातून, चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य काय असते हे, सप्रयोग दाखवत आली आहे. चमत्काराचा दावा करणार्‍या बुवाबाबांना रोख रकमेचे आव्हान देत आली आहे. त्यामुळे समाजातील, युवा पिढीतील, विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकासित होण्यास मोठा हातभार लागलेला आहे. हजारो शिक्षकांना, याबाबत दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते.

धर्माची विधायक, कृतिशील आणि कालसुसंगत चिकित्सा करण्याचा समितीने नेहमीच आग्रह धरलेला आहे. पर्यावरण पूरक सण उत्सव साजरा करावा, असे पथदर्शी उपक्रमांतून आवाहन करण्यात येत असते. यामध्ये अनेक वेळा सामाजिक रोषाचा सामना करावा लागलेला आहे. मात्र भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच हे काम केले जाते. त्याप्रमाणे कार्यकर्ते कामात सर्वांच्या श्रद्धा, भावनांचा आदर राखून, काळजी घेत असतात. मानवतावादासाठी विवेकवाद हा आग्रह समिती समाजाला करीत असल्याने, थोड्याच कालावधीत समाजाचा पाठिंबाही या कामास मिळतो, असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासारखे वा अन्य क्षेत्रातील सुयोग्य परिवर्तनासाठी कार्यरत असणार्‍या व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांना सोबत घेऊन, त्यांच्यासोबत राहून,त्यांनाही पूरक असे काम संघटितपणे उभे करण्याचा समितीचा मानस कायम राहिलेला आहे.

महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकांची विचारसरणी आणि संविधानातील मूल्यांची समाजात जाणीवपूर्वक रूजवणूक करण्यासाठी समितीने सतत प्रयत्न केलेला आहे. पुढील काळातही त्यासाठी, मोठ्या प्रमाणात कृतिशील उपक्रमांतून प्रयत्न करण्याचा समितीचा निर्धार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत असताना कार्यकर्त्यांना अनेक वेळा सामाजिक संघर्ष करावा लागतो. त्यासाठी जर कायद्याचा कणखर आधार मिळाला तर हे काम सोपे होते. ही बाब सुरुवातीपासूनच समिती धुरीणांनी लक्षात घेऊन, जादूटोणाविरोधी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. समाजाचा पाठिंबा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात कायद्याची गरज वेग- वेगळ्या प्रकारे समाजात मांडण्यात आली. त्यासाठी आंदोलने, मोर्चे, उपोषणे, धरणे करावे लागले. मात्र डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन लागू झाला. मागील सात वर्षांमध्ये या कायद्यांतर्गत अनेक अंधश्रद्धांच्या प्रकरणांमध्ये भोंदूबुवांनी केलेले शोषण आणि फसवणूक या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये भोंदू बुवांना न्यायालयाकडून शारीरिक शिक्षा आणि आर्थिक दंड फर्मावले गेलेले आहेत.

आपल्या समाजात जातीय उतरंड आहे. या जातींमध्ये अनेक पोटजाती आहेत. आणि त्या जाती-पोटजातींमध्ये ‘जात पंचायत’ नावाची, प्रचलित न्यायव्यवस्थेला आव्हान देणारी ‘जातपंचायत’ नावाची अन्यायकारक न्यायनिवाडा करणारी पंच-व्यवस्था आजही अस्तित्वात आहे. आपल्याच जात बांधवांचे विविध प्रकारे शोषण करणारी अमानवीय व्यवहार करणारी ही जात पंचायत असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे उघडकीस आणले. कायद्याने अशा जुलमी प्रकारांना आळा बसवण्यासाठी, कायद्याचा धाक बसावा यासाठी समितीच्यावतीने, ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ ही शासनाकडे सतत पाठपुरावा करून, समितीने मंजूर करून घेण्यात यश मिळवले. त्यामुळे अनेक जातपंचायतींनी, त्यांच्या जात पंचायती रद्द करीत असल्याचे जाहीर केले. पीडितांना न्याय आधार मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागील तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून, संघटितपणे चाललेले हे समाज परिवर्तनाचे प्रमुख काम, महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात समाजापुढे येणे, त्याची तोंडओळख होणे अत्यंत आवश्यक आहे, असे वाटते. म्हणून या पुढील लेखांमध्ये समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कोणकोणते काम, कसकसे होत गेले, झाले. प्रत्यक्ष काम करीत असताना कार्यकर्त्यांना कोणकोणते अडथळे आले, कशाप्रकारे संघर्ष करावा लागला, त्याचे चांगले-वाईट परिणाम काय झाले, पुढील आव्हाने कोणकोणती आहेत, याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न राहील. तसेच विज्ञानाचा आणि अध्यात्माचा गैरवापर करून समाजात अंधश्रद्धा फैलावणे, नवीन नवीन अंधश्रद्धांना जन्म देणे, त्याद्वारे समाजाचे वेगळ्या अंगाने शोषण आणि फसवणूक करणे याला पायबंद घालण्यासाठी समितीने संघटितपणे काम करण्याचा वस्तुपाठ समाजात उभा केला आहे. त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील मानवी घटकांना विशेषतः युवा पिढीला, महिलांना प्राधान्य देऊन, हे काम संघटितपणे ग्रामीण,आदिवासी भागात अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे. त्याचा आढावा पुढील काही लेखांमध्ये घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-डॉ.ठकसेन गोराणे,
-राज्य सरचिटणीस,
-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -