राज्यात आतापर्यंत ३२ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

राज्यात ३२ लाख ७७ हजार ७७८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Mumbai
shivbhojan thali
प्रातिनिधिक फोटो

राज्यात कोरोना संकटाच्या काळात कुणीही मजूर उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ लाख ७७ हजार ७७८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यात १ मे ते ३० मे पर्यंत ८३८ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३२ लाख ७७ हजार ७७८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे देखील छगन भुजबळ यांनी सांगितले.

धान्याचेही वाटप सुरू

दरम्यान, राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले. त्यानुसार १ मे ते ३० मे पर्यंत राज्यातील १ कोटी ५१ लाख ३६ हजार ९८७ शिधापत्रिकाधारकांना ७३ लाख ६५ हजार ४०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख ५५ हजार ४२० क्विंटल गहू, १५ लाख ७९ हजार ११८ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ८८७ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख ३७ हजार ३३४ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मे पासून एकूण १ कोटी ३० लाख ७२ हजार ७५८ रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी ८८ लाख ७५ हजार ५३७ लोकसंख्येला २९ लाख ४३ हजार ७८० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.


हेही वाचा – कोरोना विषाणूची लस डिसेंबर पर्यंत बाजारात येण्याची शक्यता – चीन


राज्य सरकारने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे आणि जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आता पर्यंत ७ लाख ८७ हजार ८० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ७८ हजार १०५ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे आणि जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.