सांगली: बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचा देखील बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली आहे.

mother dies while rescuing drowning son in sangli
सांगली: बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जाणाऱ्या माय-लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. खेळता खेळता पाय घसरुन १० वर्षाच्या मुलाचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आई देखील बुडाली. राणी चंद्रकांत पारसे (३०) आणि पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे (१०) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत.

नेमके काय घडले?

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार; सांगली येथील सोमेश्वरनगर परिसरातील शुक ओढा येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राणी पारसे आपल्या १० वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी खेळता खेळता पृथ्वीराज याचा पाय घसरला आणि तो ओढ्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच आई राणी यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी त्या स्वतःच पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. परिसरातील नागरिकांनी माय-लेकास वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, यात यश आले नाही. दोघांच्या शोधासाठी सांगली येथून बोटी मागवल्या. दुपारी दोनच्या सुमारास राणी यांचा मृतदेह घटनास्थळापासून ५० ते ६० मीटर अंतरावर सापडला, तर मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

गेल्या चार दिवसांपासून आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. वाढलेला पावसाचा जोर आणि टेंभू योजनेतून येणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीतील तलाव पूर्ण भरले आहे. सांडव्यातून ओढ्यात पाणी जात असल्याने ओढा दुथडी भरून वाहत आहे. तसेच जोरदार पावसामुळे ओढ्याच्या काठांवरील माती, मुरूम उखडला आहे. यामुळेच पृथ्वीराज घसरून पडला असावा, असा अंदाज परिसरातील नागरिकांनी वर्तवला. दरम्यान, या घटनेमुळे सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


हेही वाचा – देवळा तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य अपेक्षित