मनसे ‘दुर्मिळ प्रजातीचा पक्ष’

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

MNS
मनसे दुर्मिळ प्रजातीचा पक्ष - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे निकालावर परिणाम होईल असे वाटत होते. परंतु विरोधकांचे सर्व प्रयोग फसल्याचेच या निकालावरून स्पष्ट झाले. या निवडणुकीत मनसेने बाहेरून विरोधकांना पाठींबा दिला. यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली. मात्र, पक्षाचे विचार न पटल्याने अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे राज्यात मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष राहीला असून या माध्यमातून आता निवडून येणे शक्यही नाही, अशी टीका राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

नाशिक येथे शुक्रवारी (ता. 31) वन विभागाच्या राष्ट्रीय परिषदेप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता मुनगंटीवार यांनी मनसेवर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत मनसेने अगदी खालच्या पातळीवर जाऊन मोदींविरोधात अत्यंत विषारी प्रचार केला. परंतु सगळे प्रयोग फसल्याने त्यांची आता अस्तित्वासाठी केविलवाणी लढाई सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, अगोदरही हे दोन्ही पक्ष एकत्र होतेच, विलीन झाल्याने त्यांच्यात अधिक स्पर्धा वाढेल. पण आता शून्य अधिक शून्य एक होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आता शक्तीहीन झाले आहेत. ४७ वर्ष २ महिने १ दिवस राज्यात सत्ता होती, पण हे नेते भाषणात हा रस्ता झाला नाही, शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याचे सांगत होते. पंधरा वर्ष सत्ता उपभोगणारे जर असे बोलत असतील तर मग याला जबाबदार कोण? सत्ता उपभोगूनही आपण नापास झालात आणि नापास विद्यार्थी मेरीटमध्ये येणार्‍या विद्यार्थ्याला शिकवत असेल तर यापेक्षा दुसरे आश्चर्य काय असू शकते असा टोलाही त्यांनी लगावला.

हे वाचा – चिंतन! ‘लाव रे त्या व्हिडिओ’च्या अपयशाचे

आघाडीतील अनेक नेते भाजपात येण्यास इच्छुक असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे खरयं की, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या पक्षात यायला तयार आहेत. पण भाजप म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही. ‘राईट पर्सन इन राईट पार्टी’ आणण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. देशाची सेवा करण्यासाठी जर कोणी पक्षात येऊ इच्छित असेल तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे त्यांनी सांगितले.

पक्ष घेईल तो निर्णय मान्य

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपण स्विकारणार का असे विचारले असता ते म्हणाले, भाजपमध्ये कोणताही निर्णय हा कोअर कमिटी घेत असते. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणे हे आमचे कामच आहे. विचारणा झाल्यावर नाकारण्याचा अधिकार नाही. पक्ष जी जी जबाबदारी देईल ते स्विकारावी लागते. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षाची कोअर कमिटी घेईल असे त्यांनी सांगितले.

कोणतेही खातं कमी महत्त्वाचं नाही

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग खाते दिल्याने सेनेत नाराजी आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कोणाला कोणते मंत्रीपद द्यावे, हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार असतो. देशाच्या विकासाचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे आणि त्यात अवजड उद्योग मंत्रालयाचाही महत्त्वाचा वाटा आहे. भेलसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात अग्रेसर होतोय. खातं महत्त्वाचं नाही असे म्हणणे हे चुकीचे आहे. शरीरात जसे प्रत्येक अवयव महत्त्वाचे असतात तसे खातेही महत्वाचे असते. सावंत यांच्या नावात अरविंद म्हणजे ‘ए’ आहे. नावाच्या सुरुवतीला जसा ‘ए’ आहे तसे ते हे खातंही ‘ए’ दर्जाचे करतील असे ते म्हणाले.