घरमुंबईदारुड्या भावाची बहिणीसह भावोजीकडून निर्घृणरीत्या हत्या

दारुड्या भावाची बहिणीसह भावोजीकडून निर्घृणरीत्या हत्या

Subscribe

दोन्ही आरोपींना अटक; दोघांचा ताबा आरसीएफ पोलिसांकडे

गोवंडी येथे राहणार्‍या देवेंद्र नरेंद्र आखाडे नावाच्या दारुड्या भावाची तिच्याच बहिणीसह भावोजीनी हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी बहिण रेश्मा सुशील ओव्हाळ आणि तिचा भावोजी सुमीत चंद्रकांत पाटणकर या दोघांनाही गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली असून या दोघांचा ताबा आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.मंगळवारी 3 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता चेंबूर परिसरात आरसीएफ पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. या तरुणाचे दोनही हातपाय बांधून त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चिखलवाडीतील रेल्वे पटरी क्रमांक दोन ते तीनमधील एरंडाच्या झाडीमध्ये टाकून मारेकर्‍याने पलायन केले होते.

याप्रकरणी आरसीएफ पोलिसांत हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. हा तपास सुरु असताना 1 डिसेंबरला याच परिसरात एक महिला आणि एक पुरुष संशयास्पद फिरत होते अशी माहिती पोलीस नाईक अंकुश वानखेडे यांना मिळाली होती. या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग असावा म्हणून पोलिसांनी त्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीवरुन पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील आशा कोरके, शरद धराडे, गणेश पाटील, दृष्यंत कोळी, राजेंद्र पेडणेकर, अमोल हाक्के, अंकुश वानखेडे, अमीत महांगडे, विकास पवार, शितल लाड यांनी रेश्मा सुशील ओव्हाळ हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिनेच या तरुणाची हत्या केल्याची कबुली दिली. हा तरुण अन्य कोणीही नसून तिचा सख्खा भाऊ देवेंद्र आखाडे असल्याचे सांगितले.

- Advertisement -

देवेंद्र हा काहीच कामधंदा करीत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यातून तो घरी शिवीगाळ करुन सर्वांना त्रास देत होता. त्याची पत्नी सात वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. तीन महिन्यांपूर्वी याच कारणावरुन तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तरीही त्याच्या स्वभावात बदल झाला नव्हता. त्यामुळेच तिने 1 डिसेंबरला राहत्या घरी देवेंद्रची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने तिच्या बहिणीचा पती सुमीत पाटणकर याची मदत घेतली होती. त्याचे हातपाय बांधून या दोघांनी त्याचा मृतदेह चिखलवाडी येथून फेंकून पलायन केले. पोलीस तपासात ही माहिती उघडकीस येताच महेश देसाई यांच्या पथकाने सुमीतला त्याच्या चेंबूर येथील राहत्या घरातून अटक केली. त्यानेही हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी रेश्माला मदत केल्याचे सांगितले.

रेश्मा ही गोवंडीतील यादव डेअरीजवळील शिवशक्ती गल्ली, रुम क्रमांक 108 तर सुमीत हा चेंबूरच्या लालडोंगर, आनंद शाळेजवळील शिवशक्ती गल्लीत राहतो. रेश्मा ही गोवंडीतील शिवज्योत पतपेढीमध्ये कामाला असून ती महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम करीत होती. त्यासाठी तिला पतपेढीकडून कमिशन मिळत होते. देवेंद्रच्या मद्यप्राशन, त्यातून घरात होणार्‍या भांडणाला कंटाळून तिने त्याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -