घरमुंबईभावी नेतृत्त्व घडवण्यासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार

भावी नेतृत्त्व घडवण्यासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार

Subscribe

मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमधील 130 विद्यार्थ्याना उपसंचालक कार्यालयातर्फे मार्गदर्शन

नेतृत्त्ववान भावी पिढी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्व गुण विकसित करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई उपसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील 130 एनएसएसच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षणातून फक्त डॉक्टर, इंजिनियरच घडू नयेत तर सैनिक, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार घडावेत त्याचबरोबर राष्ट्रनिष्ठा व सुजाण नागरिक घडावेत यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे 12 ते 14 जानेवारीदरम्यान पालघरमधील तांदुळवाडी येथे विशेष नेतृत्त्व गुण विकास निवासी व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील 130 एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावेत यासाठी नाईक फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतलेल्या शिबिरामध्ये त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यांचा आदर करणारा नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आवश्यक असलेले मूल्य शिक्षण, वक्तशीरपणा, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वच्छतेबाबत जागरुकता, योग याचे धडे विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये देण्यात आले. नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत व त्यातील बारकावे तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नेतृत्त्ववान होण्याबरोबरच त्यांच्याकडून मूल्यही जपली गेली पाहिजेत यासाठी त्यांना मूल्यशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुरू, आई-वडील यांचा आदर करणे, राष्ट्रनिष्ठा जोपासणे, सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य जपण्याबाबत मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक भास्करराव बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भास्करराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभाग समन्वयक विनोद गवारे यांच्यासह जिल्हा समन्वयकांनी शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली.

निसर्गाच्या सानिध्यात दिले प्रशिक्षण
नेतृत्वगुण विकास व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटू नये यासाठी त्यांना तांदुळवाडी गावातील वैतरणा नदीच्या काठावर निसर्गाच्या सानिध्यात प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे तीन दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंदाने शिक्षण घेतल्याची माहिती मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक भास्करराव बाबर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -