घरमुंबईअवघ्या २६ दिवसात ५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

अवघ्या २६ दिवसात ५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

Subscribe

ठाणे रेल्वे पोलिसांची कारवाई

लोकलमधील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून पळणार्‍या चोरट्यांविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी धडक मोहीम राबवलली असून ऑक्टोबर महिन्यात अवघ्या २६ दिवसांत पोलिसांनी १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये एका सोनारासह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख २२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. हैदर अनासल शेख (वय २२), तारू अहमद अली शेख (वय २८), नरेश गायकवाड (वय ३५), आणि जवाहिर अण्णासो अंबादास सरक या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी हे कळवा येथील राहणारे आहेत.

हैदर याच्याकडून दोन गुन्ह्यातील ३१ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि ४५ हजार रूपयांचा लक्ष्मी हार हस्तगत करण्यात आला आहे. तारू शेख याने ७ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्या घरातून १ लाख ५६ हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यामध्ये ६० हजाराचे मंगळसूत्र, ४५ हजार आणि ३५ हजार रूपयांच्या दोन सोन्याची चैन आदींचा समावेश आहे. तारू याने काही ऐवज टिटवाळा येथील अण्णासो सरक या सोनाराला विकला होता. पोलिसांनी त्या सोनाराकडूनही १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस डी पोवळ, पोलीस हवालदार मडव, पोलीस नाईक काळे, जाधव, पोलीस शिपाई जाधव, साळूंखे, सययद यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे स्थानकावरील ठाणे हे महत्वाचे स्थानक ओळखले जाते. लोकल, लांबपल्ल्याच्या गाडया, कोकण रेल्वे या भागातून प्रवास करते. ठाणे रेल्वे स्थानक ते दिवा ते पनवेल तसेच एरोलीपर्यंत अशी लांबलचक हद्दीची सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे रेल्वे पोलिसांवर आहे.वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन टीम काम करीत आहेत. मात्र सर्व स्थानकांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वर्दळ अधिक असते. प्रवाशांनी खचून भरलेल्या लोकलमध्ये सकाळ संध्याकाळ तुफान गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या किंमती सामानावर डल्ला मारत आहेत. पाकिट मारणे, खिसा कापणे मोबाईल, बॅग चोरणे किंवा महिलांच्या पर्स कापून त्यातील सामान लांबवणे. सोन्याचे मंगळसूत्र व चैन हिसकावणे हे प्रकार नेहमीच घडत असतात. तसेच लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा अन्य काही वस्तूने फटका मारून त्यांच्या हाताील बॅग किंवा मोबाईल हिसकावण्याचे प्रकारही पारसिक बोगद्यात होत असतात.

सोन्याचे दागिने हिसकावून पळणार्‍या चोरटयांना अटक करण्यात आणि त्यांच्याकडून सोने हस्तगत करण्यात पोलिसांनी चांगलच यश आले आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी या चोरटयांना अटक केली आहे. रेल्वे हद्दीत घडणार्‍या गुन्ह्यांवर अंकुश मिळवण्यासाठी ठाणे रेल्वे पोलीस कसून प्रयत्न करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -