वीजबिल कमी करा, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा – राज ठाकरे

वेळ पडल्यास मनसे रस्त्यावर उतरेल

Raj thackrey electricity issue

लोकांची वीजबिले कमी व्हायला हवीत, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वीज कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिला. आज राज ठाकरे यांच्या भेटीला अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड आणि बेस्टचे प्रतिनिधी आले होते. यावेळी वाढीव वीजबिलांची कारणे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी काय करताा येईल याबाबतची चर्चा राज ठाकरे यांनी वीज कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत केली. एईएमएलचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी कपिल शर्मा तर बेस्टचे वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटसुते हे उपस्थित होते. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत उपस्थित होते.

वेळ पडल्यास मनसे रस्त्यावर उतरेल – बाळा नांदगावकर

लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांच्या रोजगार गेला असुन आर्थिक अडचणीला प्रचंड सामना करावा लागत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकांच्या वाढीव वीज दरवाढीला प्रचंड विरोध आहे व वेळ पडल्यास लोकांच्या बाजूने मनसे रस्त्यावर उतरेल असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बील कंपन्यांनी लोकांना वाढीव वीज बील पाठवले होते. या वाढीव वीज बीलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस नयन कदम, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाला वीज बील कमी करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून लोकांचे वीज बील कमी होत नव्हते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या वीज बील कंपन्यांविरोधात आंदोलन तसे मोर्चे काढण्यात आले. आज मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची अदानी इलेक्ट्रिकसिटिचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शर्मा व बेस्टचे मुख्य अधिकारी पाटसुते यांनी वीज दरवाढी संदर्भात भेट घेतली. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत उपस्थित होते.