मोबाईल चोरीचे पासवर्ड ‘कौआ’ आणि ‘मशीन’

Mumbai
thieves who theft at amdar niwas arrested
मोबाईल चोरी

 मुंबई बांगलादेश आणि नेपाळ देशात चोरीचे मोबाईल फोनची तस्करी करणार्‍या एका टोळीच्या म्होरक्यासह दोघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या म्होरक्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत ९०च्या दशकात ज्या पद्धतीने रेल्वे आणि बेस्ट बसमध्ये पाकिटमाराच्या टोळ्या कार्यरत होत्या, त्याच प्रकारच्या मोबाईल चोरांच्या टोळ्या मुंबईत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या टोळ्यांना ’कंपनी’ असे नाव देण्यात आले असून मोबाईल चोराला ’मशीन’ असे म्हणतात. या मशीनच्या टार्गेटवर असणार्‍या प्रवाशांच्या मोबाईलला ’कौआ’ म्हटले जाते.

मुंबई आणि ठाण्यात १० ते १२ कंपन्या काम असून एका कंपनीमध्ये १५ ते १६ मशीन काम करतात. प्रत्येक कंपनीचा एक म्होरक्या असून या म्होरक्याला ’भाई’ असे बोलले जाते. महत्वाचे म्हणजे मशीन आणि ’भाई’ मध्ये एक व्यक्ती काम करतो त्याला ’एजंट’ बोलले जाते. हा एजंट मशिनकडून चोरलेले कौआ (मोबाईल फोन) घेऊन ते कंपनीच्या भाईला पोहचवण्याचे काम करतो, प्रत्येक कौआ मागे मशीनला २ ते ४ हजार मिळतात. भाई हे कौआ (मोबाईल फोन) जमा करून दोन आठवड्यांनी त्याचे पार्सल करून कुरिअरने किंवा स्वतःच्या माणसाच्या हातून हे पार्सल पश्चिम बंगाल येथे रवाना करतो, तेथून ते पार्सल बांगलादेश आणि नेपाळ या देशात पाठवले जाते.

मुंबई ठाण्यात १० ते १२ कंपन्या असून प्रत्येक कंपनीने आपला परिसर ठरवून घेतलेला आहे, एक दुसर्‍याच्या परिसरात शिरकाव करायचा नाही, केल्यास ज्या परिसरातून मोबाईल चोरला असेल तो मोबाईल त्याच परिसरात कंपनीचा होईल असा नियम या कंपन्यांनी करून घेतला आहे. या कंपन्या अंधेरी, बोरोवली, कुर्ला, गोवंडी शिवाजी नगर,मुंब्रा, कल्याण आणि वसई येथे कार्यरत आहे. या कंपन्यातील मशीन त्याच्या विभागातील रेल्वे स्थानक, बस स्थानकात टार्गेट फिक्स करून त्याच्याकडील कौआ उडवण्याचे काम करतात. या कंपन्या मागील काही वर्षांपासून रेल्वे आणि शहरातील बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरीचे काम करीत आहे. रेल्वे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी चोरीचे मोबाईल फोन विकत घेणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर या कंपन्या तयार झाल्या आणि हे परस्पर चोरीचे मोबाईल घेऊन ते मुंबईत त्याची विक्री न करता थेट बांगलादेश आणि नेपाळ येथे पाठवण्यात येत होते.

विलेपार्ले पोलसांनी अटक केलेल्या जाहीद शेख हा एका टोळीचा म्होरक्या असून त्याची कंपनी वांद्रे ते बोरिवली पर्यंत चालते. विलेपार्ले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे, सपोनि. शिव भोसले, पोउनि प्रदीप अहीर आणि पथकाने हि कामगिरी केली असून अधिक तपास सपोनि. शिव भोसले हे करीत आहे.