‘सुट्टी द्या, नाहीतर बायको सोडून जाईल’, पोलीस शिपायाची विनवणी!

Lucknow
uttar pradesh police
उत्तर प्रदेश पोलीस

“सर मला सुट्टी द्या, नाहीतर बायको सोडून जाईल”, अशी आर्त विनवणी उत्तर प्रदेशचे पोलीस शिपाई धर्मेंद्र सिंह याने आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये नोकरीसाठी तैनात असलेल्या या पोलीस शिपायाने तेथील पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्याने लिहिले आहे की, सुट्टी न मिळाल्याने चार महिन्यांपासून तो घरी गेला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला दहा दिवसांची सुट्टी घ्यायला सांगितले. त्याचबरोबर दहा दिवसांची सुट्टी घेऊन न आल्यास घरी येण्याचीही गरज नसल्याचे त्याच्या पत्नीने त्याला सांगितले आहे.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये विविध राज्यांमध्ये धुळीच्या वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातले आहे. या वादळात आतापर्यंत ३९ लोकांचा मृत्यू झाला असून, ५० लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत पोलीस शिपायांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे कामाच्या दबावामुळे सगळ्याच शिपायांच्या सुट्या रद्द झाल्या आहेत.

धर्मेंद्र सिंह यांच्या विषयी बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘धर्मेंद्रला दहा दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मागच्या महिन्यात आग्रामध्ये असा प्रकार घडला होता’, असेही त्यांनी सांगितले. त्या पोलीस शिपायाचे नवीन लग्न झाले होते. त्यामुळे त्याला कामात लक्ष केंद्रित करता येत नव्हते. त्यामुळे त्यानेही वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. त्याने वरिष्ठांना दिलेल्या पत्रानंतर त्यालाही आठ दिवसांची रजा देण्यात आली होती. नियमाप्रमाणे सगळ्यांना साप्ताहिक सुट्टी असते. परंतु, ती द्यायची की नाही हे जिल्हा पोलीस अधिकारी ठरवतात. परंतु, काही वेळा सुरक्षाव्यवस्था आणि कामाच्या दबावामुळे सुट्टी देणे शक्य होत नाही.