घरट्रेंडिंगShivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना...

Shivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

Subscribe

मुंबई / नागपूर – महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ अजुनही सुरुच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापले आहे, तर दुसऱ्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. तर दोन ठिकाणी शिवसेना शिंदेगटाने अजुन उमेदवारी जाहीर केलेली नाही. असे असले तरी महायुतीमध्ये शिंदे गट 16 जागा लढणार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिंदे गटाला उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षावर विसंबून राहावे लागत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे सोबत गेलेल्या खासदारांची काय स्थिती झाली ते आता समोर येत असल्याचे महाराष्ट्र पाहत असल्याचा टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूकांची काय स्थिती होईल, हे आताच दिसत असल्याचे ते म्हणाले. गद्दारांसाठी आमचे दार बंद असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाशिक – छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार ठरेना

शिवसेना शिंदे गटाने नाशिक आणि औरंगाबाद (छ. संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघांसाठी अजुन उमेदवारांची घोषणा केलेली नाही. नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. तर छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2019 चा अपवाद सोडल्यास येथून शिवसेनेचेच उमेदवार येथून विजयी झालेले आहेत. यंदा महायुतीत मात्र शिवसेना शिंदे गटाने येथे अजून उमेदवार घोषित केलेला नाही. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंसोबत गेलेल्यांना जोरदार टोला लगावला आहे. गद्दारांची स्थिती अतिशय वाईट झाली असल्याचे ते म्हणाले. ते नागपूर विमानतळावर माध्यमांसोबत संवाद साधत होते.

- Advertisement -

गद्दारांनी आता विचार करावा – आदित्य ठाकरे

बंडखोर आणि गद्दार यांच्यात खूप फरक असतो, असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, रामटेकमध्ये गद्दारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. शिंदेंसोबत गेलेल्या चाळीस आमदारांनाही आता विचार करावा. जिथे-जिथे गद्दारी झाली,तिथे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

हेही वाचा : Modi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटची चर्चा

- Advertisement -

अनिल परबांचाही शिंदे गटाला टोला

एकनाथ शिंदे यांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्यासोबत गेलेल्या 13 खासदारांच्या जागा तरी राखाव्यात, असा टोला ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, शिंदे म्हणाले होते 13 पैकी एक खासदार जरी पडला तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल. आता त्यांनी त्यांच्या शेतीतील अवजारे तयार ठेवावी, कारण रामटेकच्या खासदाराला त्यांना तिकीटही देता आलेले नाही, असा टोला परबांनी लगावला.

शिंदेसोबतच्या चाळ आमदारांची स्थिती वाईट होणार

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही शिंदेंसोबतच्या खासदार, आमदारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीतच गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली आहे. अजून विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांचे काय होणार हे आताच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांनाही तिकीट मिळते की नाही, यासाठी भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

वैभव नाईक म्हणाले की, शिंदे गटातील खासदारांची स्थिती काय झाली आहे ती महाराष्ट्राने पाहिली आहे. शिवसेनेच्या 2014 आणि 2019 मधील सगळ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी दिली होती, ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे हे कुणापुढेही झुकले नाहीत. तेव्हा कोणत्याही खासदाराला शंभर गाड्या घेऊन कोणालाही भेटण्याची गरज नव्हती, असा टोला हेमंत गोडसेंना लगावला. गोडसे यांनी ठाण्यात नुकतेच शक्ती प्रदर्शन केले होते. ठाकरेंचे आमदार म्हणाले की, एकत्रित शिवसेनेच्या काळात उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचा उमेदवार बदला असं म्हणण्याची भाजपची हिंमत नव्हती. आता खुलेआम ती मागणी होत आहे, असे म्हणत त्यांनी हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.

हेही वाचा : Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -