सर्बियाचा अव्वल सीडेड टेनिसपटू आणि गतविजेत्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले आहे. सेंटर कोर्टवर झालेल्या सामन्यात जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या २० व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात असलेला जोकोविच या सामन्यामध्ये किमान पाच वेळा तरी घसरला आणि पडला. परंतु, त्याने जिद्दीने खेळ करत हा सामना जिंकत स्पर्धेत आगेकूच केली. ३४ वर्षीय जोकोविचचा पुढील फेरीत इटलीचा अनुभवी खेळाडू आंद्रेस सेप्पी किंवा अमेरिकेच्या डेनिस कुडलाशी सामना होईल.
पुन्हा जोकोविचनेच बाजी मारली
दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने सहजपणे विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत १०२ व्या स्थानावर असलेल्या केविन अँडरसनने २०१८ मध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती आणि त्यावेळी त्याला जोकोविचने पराभूत केले होते. यंदा दुसऱ्याच फेरीत हे खेळाडू आमनेसामने आले आणि पुन्हा जोकोविचनेच बाजी मारली. अँडरसनला या सामन्यात फारशी झुंज देता आली नाही. त्यामुळे जोकोविचने हा सामना ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये जिंकला.
2011: ✅
2015: ✅
2018: ✅
2021: ✅History repeats itself for @DjokerNole as the defending champion beats Kevin Anderson again at #Wimbledon to progress to the third round pic.twitter.com/RlkJIYNoIq
— Wimbledon (@Wimbledon) June 30, 2021
स्विटोलिना दुसऱ्या फेरीत
महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या एलिना स्विटोलिनाला पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. तिने बेल्जियमच्या अॅलिसन वॅन युत्वनॅकवर ६-३, २-६, ६-३ अशी मात केली. तसेच ३१ व्या सीडेड डारिया कास्तकीनाने मारिया टिगचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.