घरमहाराष्ट्रनाशिकनाफेडची खरेदी बंद होताच कांदा दरात घसरण

नाफेडची खरेदी बंद होताच कांदा दरात घसरण

Subscribe

नाशिक : बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे माहिती येताच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दर घसरले आहे. येथील बाजार आवारात उन्हाळ कांद्याला सरासरी ११४० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

नाफेडचे कांदा खरेदी शनिवार (दि. १६) पासून थांबविण्यात आली आहे. याचा परिणाम काल कांद्याच्या बाजार भावावर झाला असून मागील सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात ३५० रु. प्रति क्विंटलची घसरण झाली. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १३९४ वाहनातून सुमारे २०११२ क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजार भाव किमान ५०१ रु., कमाल १४५१ रु तर सरासरी ११४० रु प्रती क्विंटल होते. कांदा दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसून आला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद करण्यात आली आहे. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी वर्गाने कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र सततच्या पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला असून भावही घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

नाफेडने यावर्षी तब्बल अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु प्रत्यक्षात नाफेडकडून रडतखडत शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करण्यात आला. त्यापासून शेतकर्‍यांना कवडीचाही फायदा झाला नाही. दरवर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होते. परंतु यावर्षी नाफेडने इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करूनही कांदा उत्पादकांना अत्यल्प दर मिळाल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

नाफेडने शेतकर्‍यांचा विचार करावा

नाफेडने कांदा खरेदी बंद केली त्यांनी कारण म्हणून स्टॉक पूर्ण झाल्याचे सांगितले मात्र कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे यामुळे नुकसान होऊ शकते.येत्या काही दिवसातच त्याचा परिणाम मार्केटवर होण्यास सुरुवात होईल त्यामुळे कांद्याचे दर खाली येतील.नाफेडने शेतकर्‍यांचा विचार करता कांदा खरेदी सुरू ठेवणे आवश्यक आहे : रामभाऊ भोसले, शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -