घरताज्या घडामोडीनेरळ-शेलू लोकलमधून पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नेरळ-शेलू लोकलमधून पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Subscribe

हा तरुण ठाणे दिवा येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

रेल्वे प्रवासासाठी सामान्य नागरिकांना बंदी असली तरी, मोठ्या प्रमाणात तरुणाई पर्यटनासाठी कर्जत,नेरळ या भागात येत असतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे लोकल खचाखच भरुन असते. दरम्यान, नेरळ-शेलू स्थानकाजवळ लोकलने प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.  हा तरुण ठाणे दिवा येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील बाबुराव गावंडे हा २१ वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत ८ ऑगस्ट रोजी सकाळी खोपोली लोकलने नेरळ येथे येत होता. डोंबिवली स्थानकात ८.२२ च्या खोपोली लोकलला गर्दी असल्याने त्याचे पाच मित्र आणि तो वेगळ्यावेगळ्या डब्यातून प्रवास करीत होता. शेलू स्थानक गेल्यानंतर नेरळ स्थानक येणार असल्याने बाबुराव गर्दीतून वाट काढत दरवाजाजवळ येण्याचा प्रयत्न करीत होता.
दरवाजा जवळ येत असताना बाबुराव गावंडे हा नेरळ स्टेशन येण्याचे आधी एक किलोमीटरवर असलेल्या दामत फाटकात लोकल मधून खाली कोसळला. त्याचे पाच मित्र नेरळ रेल्वे स्थानकात उतरून बाबुरावला तो बसलेल्या डब्याच्या बाहेर शोधत होते. मात्र तो दिसला नसल्याने त्या मित्रांनी बाबूरावला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या फोनची बेल केवळ वाजत होती. शेवटी नेरळ स्थानकात उतरलेल्या त्या पाच तरुणांनी बाबुरावचा शोध संपूर्ण प्लँटफॉर्म वर घेण्याचा प्रयत्न केला. लोकल गेल्यानंतर सर्व प्रवासी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर दामत फाटकात कोणीतरी लोकलमधून पडला असल्याची खबर त्या पाच जणांना दिल्यानंतर त्यांची धावपळ सुरू झाली. दामत फाटकाजवळ घटनास्थळी नेरळ स्थानकातील रेल्वे पोलीस पोहचले होते. तेथे त्या तरुणांनी तो मृतदेह आपल्या मित्राचा असल्याचे पोलिसांना सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -