घरताज्या घडामोडीशक्तिशाली स्फोटाने खोपोली परिसर हादरला

शक्तिशाली स्फोटाने खोपोली परिसर हादरला

Subscribe

दुर्घटनेत महिलेसह दोघांचा मृत्यू

खालापूर तालुक्यातील ढेकू येथील जेसनोवा फार्मासिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये शक्तिशाली स्फोट होऊन खोपोली आणि खालापूर शहराचा परिसर अक्षरशः हादरून गेला. ही घटना गुरुवारी पहाटे 2.45 वाजता घडली. रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, यात आवारात राहणार्‍या महिलेसह बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लघु उद्योग स्वरुपात असणारा हा कारखाना अनधिकृतरित्या सुरू असल्याची माहिती समोर येत असून, घटनेनंतर मालक फरार झाला आहे.

सर्व नागरी वस्ती गाढ निद्रेत असताना कानठळ्या बसविणारा हा स्फोट झाल्याने नेमके काय घडले हे कुणाला काहीच समजले नाही. याचवेळी भूकंपासारखे हादरे बसल्यामुळे घबराटही पसरली. मात्र, काही वेळात आगीचे लोळ आकाशात दिसू लागल्याने काहीतरी दुर्घटना घडल्याचे लक्षात आले. अनधिकृतरित्या सुरू असलेल्या या कारखान्यात अंबरनाच्या विश्वास केमिकलमधून कच्चा माल आणून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून डाय मिथाईन अल्कोहोलची निर्मिती केली जात होती.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच खालापूर तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात होणारे वायू प्रदूषण, बहुतांश कारखानदारांची बेपर्वाई आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हा संपूर्ण तालुकाच गॅसवर असल्याकडे ‘आपलं महानगर’ने लक्ष वेधले होते. त्याची प्रचिती या दुर्घटनेने पुन्हा आली आहे. या कारखान्यात घातक रसायनाची निर्मिती केली जात असल्याने सर्व प्रकारच्या शासकीय मंजुर्‍या आवश्यक असताना केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच परवानगीने हा कारखाना सुरू असल्याने मंडळाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कारखान्यात स्फोट झाल्याचे लक्षात येताच आवारात राहणार्‍या कर्मचार्‍यांची पत्नी वैष्णवी ऊर्फ सपना कृष्णा निवबाने (३२) बाहेर पडून धावत असताना उडालेला लोखंडी पत्रा तिच्या डोक्यावर पडून, तर शेजारी पुठ्ठे तयार करणार्‍या बेस्टो कारखान्याचा सुरक्षा रक्षक अन्वर खान याचाही डोक्यात पत्रा पडून मृत्यू झाला. जखमींमध्ये कृष्णा प्रसाद निवबाने (40), कीर्ती कृष्णा निवबाने (15 महिने), आरती कृष्णा निवबाने (11), आशिष कृष्णा निवबाने (9), बिष्णोई कृष्णा निवबाने (35), गिरीष परदेशी गौडा (44), सागर रमेश कोंडीलकर (23) आणि नथू जानू पवार (30) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

कारवाई खरच होईल?
एखाद्या कारखान्यात दुर्घटना घडली की मोठी आर्थिक तडजोड होऊन प्रकरण मिटवले जात असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. ३० वर्षांपूर्वी, ५ नोव्हेंबर 1९९० रोजी, केंद्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय असलेल्या नागोठणे येथील महाकाय आयपीसीएल प्रकल्पात भीषण स्फोट होऊन 35 हून अधिक कर्मचारी, अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एकाही अधिकार्‍याला हात लावण्याची धमक जिल्हा प्रशासनाने दाखविली नव्हती. पुढे हे प्रकरण गुंडाळले गेले. दुर्घटना घडणार्‍या खासगी कारखान्यांबाबतही असेच प्रकार घडलेले सर्वज्ञात असताना ढेकू दुर्घटना संबंधित यंत्रणा गांभीर्याने घेतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आठ दिवसांपूर्वी वायू गळती आणि आता स्फोट यामुळे खालापूर तालुक्यातील नागरिक मृत्यूच्या दारात आहेत.
-संदीप ओव्हाळ, रा. ढेकू

आमच्या इमारतीला धक्का बसला. जोरात दरवाजा ठोठावला असे वाटले. भूकंप आहे असेही क्षणभर वाटले.
-अनिल चाळके, माजी सरपंच, खालापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -