घरताज्या घडामोडीसोमवारपासून शेतकर्‍यांना भरपाई,दिवाळीनंतर मंदिरे, लोकलचे राजकारण

सोमवारपासून शेतकर्‍यांना भरपाई,दिवाळीनंतर मंदिरे, लोकलचे राजकारण

Subscribe

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, तर लोकल सुरू करण्याबाबत रेल्वेला पत्र लिहिण्यात आले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

ते गुरुवारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकर्‍यांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

तसेच राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकार दिवाळीनंतर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत सध्या दिवसाला कोरोनाचे सहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. भाजपने संतांची वाणी ऐकली नाही का? देव देवळात नव्हे तर माणसात असतो. गोव्यातही अजून मंदिरे सुरू झालेली नाहीत. तिथे कोणाचे सरकार आहे. त्यामुळे भाजप मंदिरांच्या मुद्यावरुन केवळ राजकारण करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावरुन राजकारण सुरु असल्याने याबाबतचा निर्णय रखडल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -