घरदेश-विदेशसार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन, पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन, पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत आज, गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव सहभागी झाले होते. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कोरोनाच्या चाचण्या वाढविणे आणि जिनोमिक सिक्वेन्सिंगवर भर देण्यास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तसेच दुर्बळ आणि वृद्धांना बुस्टर घेण्यासाठी तयार करा, अशी सूचनाही केली.

चीनसह इतर काही देशांमध्ये कोविड-19 संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर, गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नव्या व्हेरिएंटविरुद्ध लढण्याच्या अॅक्शन प्लॅनवर चर्चा झाली. 22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील कोरोनाच्या केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे, सरासरी दैनंदिन प्रकरणे 153 पर्यंत खाली आली असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.14 टक्क्यापर्यंत आला आहे, अशी माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

- Advertisement -

सर्व स्तरांवर कोविडची संपूर्ण पायाभूत सुविधा, उपकरणे, प्रक्रिया तसेच मनुष्यबळ याबाबतची तयारी उच्च स्तराची राहील, याकडे लक्ष देण्यास पंतप्रधान मोदींनी सांगितले. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींना सांगण्यात आले की औषधे, लस आणि रुग्णालयातील खाटांच्या बाबतीत पुरेशी उपलब्धता आहे. त्यावर अत्यावश्यक औषधांची उपलब्धता आणि किमती यावर नियमित लक्ष ठेवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिल्याची माहिती आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडूनही आवाहन
कोरोनाचा फैलाव इतर देशांत होत असला तरी, याला घाबरण्याची गरज नाही. तथापि, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा. पुरेशा प्रमाणात टेस्टिंगची सुविधा आहे. त्यामुळे वेळीच टेस्ट करून घ्यावी आणि त्यानुसार उपाय करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल, बुधवारी केले.

- Advertisement -

देशातील कोविडच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तज्ज्ञांसोबत बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोविड परिस्थितीबाबत दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यादरम्यान, काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -