घरदेश-विदेश...म्हणून अरविंद केजरीवालांनी नोटांचा मुद्दा उपस्थित केला, जितेंद्र आव्हाडांची टीका

…म्हणून अरविंद केजरीवालांनी नोटांचा मुद्दा उपस्थित केला, जितेंद्र आव्हाडांची टीका

Subscribe

ठाणे : देशाची दिशा कशी बदलायची, यामध्ये काहीजण माहिर आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात आपण किती धर्माचे आचरण करीत आहोत, हे दाखविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांना माहीत होते की, यावरुन देशात वादळ उभे राहणार आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केजरीवालांवर टीकास्त्र डागले.

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीची छायाचित्रे लावण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र केजरीवालांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहे. 130 कोटी भारतीयांच्या वतीने भारतीय चलनावर महात्मा गांधीजी आणि लक्ष्मी, गणपतीचा फोटो लावण्याची विनंती करीत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आपले चलनच इतके खाली घसरत चालेलंय; त्यावर आपण बोलले पाहिजे. रुपयाची घसरत चाललेली किंमत आणि डॉलरची वाढत चाललेली किंमत ही देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. फोटो कुणाचा असावा, याच्यावर भाष्य करणे हास्यास्पद आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

लोकांच्या पुढे प्रश्न महागाईचा आहे, लोकांच्या पुढे बेरोजगारीचा आहे; महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाचा प्रश्न आहे. परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. शेतकरी जीवंत राहिल का, अशी चिंता वाटत आहे. असे अनेक प्रश्न असताना आपण कशावर चर्चा करतोय? एका धर्मनिरपेक्ष देशात काय असले पाहिजे, हे मी वेगळे सांगायला हवे का? पण, नसलेल्या विषयाचा ‘विषय’ निर्माण करुन लोकांना दुसर्‍या मार्गावर घेऊन जाण्याचे काम काही राजकीय मंडळी यशस्वीरीत्या करीत आहेत आणि आपणही त्यामध्ये सहभागी होतो, हे दुर्देवी आहे, असे आव्हाड म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग
केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरुनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले. केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या देशातील काही समाजघटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारी ट्रोल्सच्या टोळ्यापासून पत्रकारांपासून कलावंतांपर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे, असे आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

कळवा आणि भारतगिअरच्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर शिल्लक काम पूर्ण करुन कळवा पुलाचे उद्घाटन करा. मुंब्रा-कौसा येथील भारत गिअरच्या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचेही उद्घाटन करुन घ्यावे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान रहावा, अशी अपेक्षा आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

लोकांचे जे हाल होत आहेत ते तर संपवा. ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यानंतर उगाच बोंबाबोंब करायची की जितेंद्र आव्हाडांनी आगाऊपणा केला आणि पूल खुला केला. मला तसे करायचे नाही. आपण मोठ्या मनाने सांगत आहोत की, पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त आपली गाडी पुलावरून फिरवावी. कारण, लोकांना भाषणे ऐकण्याची फारकाही हौस असते अशातला भाग नाही. लालफित लावलेली असेल ती कापा; फोटो काढा; आपल्या नावाची पाटी लावा; तो पूल कोणी करून घेतला, याच्या मागे कोण आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे ती थांबवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -