घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : 400 जागांचे स्वप्न... सर्वेच्या आकड्यांनंतर NDA गेली RLD...

Lok Sabha 2024 : 400 जागांचे स्वप्न… सर्वेच्या आकड्यांनंतर NDA गेली RLD – TDP च्या दारी

Subscribe

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 400 पार हे भारतीय जनता पक्षासमोर सध्या एकमेव ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेचे टार्गेट सेट केले आहे. भाजप 370 आणि एनडीएने 400 जागा जिंकायच्या आहेत असे पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील भाषणातच सांगितले आहे. एका सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 335 जागा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्वेक्षणानुसार एकट्या भाजपला 303 जागा मिळतील. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपला पैकीच्या पैकी जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र तरीही एनडीए चारशे पार जाण्याची शक्यता कमी आहे.

इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात विजयी होणार आहे. पण यंदा एनडीएला 18 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. याचा थेट फायदा हा इंडिया आघाडीला होणार आहे. इंडियाच्या खात्यामध्ये 166 जागा जाण्याची शक्यता आहे. तर इतरांना 42 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभेपेक्षा आगामी लोकसभेत काँग्रेसची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. त्यांना 71 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणारा दुसरा पक्ष बनू शकतो. प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांना मिळून एकत्रित 168 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 351 तर एकट्य भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या.

- Advertisement -

भाजपचे एनडीएची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न

भाजपला यंदा नुकसान होताना दिसत आहे. एनडीएला 18 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने एनडीएमध्ये नवे मित्र जोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या पक्षांना एनडीएमध्ये घेण्याची जबाबदारी आपल्या नेत्यांवर सोपवलेली आहे. एनडीएची व्याप्ती वाढवण्याचे विशेष अभियान भाजपने सुरु केले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विविध पक्षातील नेत्यांना, पक्षांना एनडीएमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठे खिंडार भाजपने पाडत तिथे पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेले आहे. आता दक्षिणीतेली आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासोबतच उत्तरेकडीलही काही राज्यांवर भाजप नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मोदींनी लोकसभेतील भाषणात जाहीर केलेल्या टार्गेटपासून भाजप 65 ते 66 जागा दूर राहताना दिसत आहे. यामुळेच भाजपने आता मित्र पक्षांची संख्या वाढवण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर दिली आहे.

- Advertisement -

छोट्या छोट्या पक्षांना एनडीएमध्ये घेण्यामुळे भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता तर आहेच, पण त्यासोबतच विरोधी पक्ष विविध पक्षांना एकत्र करुन भाजपविरोधात इंडिया आघाडी मजबूत करत आहे, त्यांनाही कमकूवत करण्याचे हे प्रयत्न आहेत. विरोधी पक्षांकडून जे नरेटिव्ह रचले जात आहे की भाजपविरोधात सर्वच पक्ष एकत्र येत आहे, त्याला देखील शह देण्याचा हा प्रयत्न आहे.

भाजपने आता उत्तर प्रदेशातील काही भागात परिणामकारक असलेल्या राष्ट्रीय लोक दलसोबत (आरएलडी) आघाडीचे प्रयत्न सुरु केले आहेत. दिवंगत नेते चौधरी चरणसिंह यांना भारत रत्न घोषित करण्यात आले आहे. त्यांचे नातू जयंत चौधरी हे आता एनडीएच्या वाटेवर आहेत. त्यांचे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वर्चस्व आहे. सहारनपूर, मुरादाबाद, मेरठ, अलीगड आणि आगरा या भागात भाजपला फारसे पाठबळ नाही. येथे समाजवादी पक्षाला टक्कर देण्यासाठी आरएलडीची त्यांना मदत होऊ शकते. जाट आणि मुस्लीम व्होट बँकवर या आघाडीचा परिणाम होऊ शकतो. भाजप कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही.

दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांमध्ये 129 जागा आहेत येथे इंडिया आघाडीला मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच आंध्रप्रदेशात जगन मोहन रेड्डी आणि तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना एनडीएमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चंद्राबाबू यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती. भाजप पक्षाध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित होते. तेलंगानामध्ये बीआरएसची दहा वर्षांची सत्ता उलथवून लावत काँग्रेस बहुमतात विजयी झाली आहे. येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर केले असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत अनेक छोटे छोटे पक्षही एनडीएमध्ये येत्या काळात सामील होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -