घरदेश-विदेशभाजपाचा प्रचार थेट अमेरिका आणि इंग्लंडमधून

भाजपाचा प्रचार थेट अमेरिका आणि इंग्लंडमधून

Subscribe

भाजपा युके सेल करणार मतदानासाठी आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर आता महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग वाढला असताना प्रचारासाठी नानाविध आयडिया लढविण्यासाठी महायुतीसह महाआघाडीच्या नेत्यांमध्ये चुरस रंगली आहे. या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणण्यासाठी थेट अमेरिका आणि इंग्लंडमधून मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे.

यासाठी बीजेपी युनायटेड किंगडम चॅप्टर यांच्यासह अमेरिका आणि युरोपमधील सेल मतदानासाठी राज्यातील मतदारांना फोनवरुन आवाहन करणार असल्याची माहिती भाजपाच्या युके चॅप्टरचे अध्यक्ष कुलदीप शेखावत यांनी दिली. शेखावत हे सध्या मुंबई भेटीवर असून मुंबईत गुरुवारी काही निवडक पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. या अगोदर लोकसभा निवडणुकीत या सेलकडून भाजपासाठी मतदानाचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी हा प्रयत्न केला जाणार आहे.

- Advertisement -

राज्य विधीमंडळाच्या १३ व्या विधानसभेचे पावसाळी आणि अखेरचे अधिवेशन नुकतेच पूर्ण झाले असून यानंतर आता सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप महायुतीने अगोदरच रणशिंग फुंकले असून प्रचाराची रणनिती आखण्यासही सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर आता प्रचारासाठी आणि भाजप सरकारला मतदानाचे आवाहन करण्यासाठी थेट परदेशातून सूत्र हालणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाच्या विविध सेलप्रमाणे परदेशात देखील अनेक ठिकाणी सेल कार्यरत आहेत. त्यात प्रमुख बीजेपी युनायटेड किंगडम चॅप्टर हे सेल प्रामुख्याने कार्यरत असून या सेलसाठी परदेशात राहणारे भारतीय नागरिक यंदा विधानसभेच्या प्रचारासाठी धावून येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या सेलच्या सदस्यांकडून राज्यातील मराठी नागरिकांना फोन करुन भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती शेखावत यांनी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक माहिती देताना कुलदिप शेखावत म्हणाले की, या अगोदरही या सेलकडून लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी देशात सुमारे ७० लाख फोन केले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या संपर्कात आहोत. अंतिम मतदार यादी प्राप्त झाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानुसार फोन करणार आहोत. निवडणुकीच्या दोन किंवा तीन दिवसाअगोदर आम्ही हे फोन करणार असून भाजपाला मतदान करण्यासाठी आम्ही या फोनद्वारे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सेलमधील काही सदस्य निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात देखील येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी नमूद केले.

काय आहे भाजप युके चॅप्टर
भाजप युके चॅप्टर हे इंग्लडमधील भाजपप्रणीत एक सेल आहे. या सेलचे एकूण ११ हजार सदस्य आहेत. इंग्लडप्रमाणे अमेरिकासह इतर सहा ठिकाणी हे सेल आहेत. यातील अनेक सदस्यांना मराठी बोलता आणि लिहिता येते. कुलदीप शेखावत हे या सेलचे अध्यक्ष आहेत. शेखावत हे गेल्या २२ वर्षांपासून युकेत राहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -