घरताज्या घडामोडीआहार भान - लिंबाचे गोड लोणचे

आहार भान – लिंबाचे गोड लोणचे

Subscribe

आहार भानच्या या काही भागात आपण हिवाळ्यात करण्यात येणारे साठवणीचे पदार्थ करत आहोत. गेल्या भागात आपण लिंबाचे गोड तिखट लोणचे केले. आज आपण लिंबाचे गूळ घालून गोड लोणचे करूया. जेव्हा तापाने किंवा दुसऱ्या आजाराने , औषधांनी तोंडाची रुची जाते, अजिबात तिखट खाता येत नाही तेव्हा हे गोड लोणचे खूप मस्त वाटते. तिखट खाऊ न शकणाऱ्या लहान बाळांना आणि वृद्ध व्यक्तीनाही हे लोणचे चालते.

साहित्य

- Advertisement -
  • ताजी, पिवळी रसदार लिंबे – १०
  •  गूळ – अर्धा किलो
  • सैंधव मीठ – ३, ४ चमचे

कृती 

१. दहा बारा रसदार लिंबे धुवून घ्या. प्रत्येक लिंबाचे १०-१२ तुकडे करा. जमतील तेवढ्या बिया काढून टाका.

- Advertisement -

२. एका काचेच्या कोरड्या बरणीत या फोडी थोडे थोडे सैंधव मीठ घालून ठेवा. बरणीचे झाकण घट्ट बंद करा.

३. सूर्य प्रकाश लागणार नाही अशा कोरड्या जागी ही बरणी ठेवा. रोज एकदा दोनदा बरणी चांगली हलवा म्हणजे लिंबाच्या फोडींना मीठ चांगले लागेल.

४. ७-८ दिवसांनी लिंबाच्या फोडी नरम होतात. तेव्हा एका चाळणीत या फोडी काढून ठेवा म्हणजे फोडींना सुटलेले पाणी निथळून जाईल.

५. एका जाड बुडाच्या कढईत अर्धा किलो किसलेला गूळ घ्या. मंद आचेवर हळू हळू ढवळा.

६. गूळ थोडा पातळ झाला की त्यात लिंबाच्या फोडी घाला. मंद आचेवर ढवळत रहा.

७. थोड्या वेळाने पातळ झालेला गूळ किंचित दाटसर व्ह्यायला लागतो. सोनेरी काळसर रंगाचा होतो.

८. आता गॅस बंद करायचा पण लोणचे ढवळत राहायचे नाहीतर खाली करपते. गरम कढईच्या उष्णेतत पाक शिजत राहतो.

९. थंड झाल्यावर पाक घट्ट होतो. फार घट्ट होवू द्यायचा नाही. मधा सारखा झाला पाहिजे.

१०. लोणचे थंड झाल्यावर काचेच्या कोरड्या बरणीत सूर्य प्रकाश लागणार नाही अशा जागी ठेवावे.

११. १५-२० दिवसांनी लोणचे मुरल्यावर फार टेस्टी लागते.

डॉ.ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -