घरदेश-विदेशCDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांचं निधन, मोदी-राहुल गांधींसह अनेकांकडून शोक...

CDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांचं निधन, मोदी-राहुल गांधींसह अनेकांकडून शोक व्यक्त

Subscribe

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलीका रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटेनत मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची भारतीय हवाई दलाने ट्विटरवर माहिती दिली. बिपिन रावत यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह सर्व दिग्गजांनी रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बिपीन रावत एक असामान्य सैनिक – पंतप्रधान मोदी

“जनरल बिपीन रावत एक असामान्य सैनिक होते. एक खरे देशभक्त होते. आपली सशस्त्र दले आणि संरक्षण सामग्रीच्या आधुनिकिकरणात त्यांचं मोठं योगदान होते. संरक्षणविषयक घडामोडींविषयींची त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असाधारण होता. त्यांच्या मृत्यूमुळे मला तीव्र दुःख झालं आहे. ओमशांती,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

- Advertisement -

देशाने आपला एक शूर पुत्र गमावला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त करताना देशाने आपला एक शूर पुत्र गमावला, असं म्हटलं. “जनरल बिपून रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थी सेवा म्हणजे विलक्षण शौर्याचे प्रतीक होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना,” असं रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

देशासाठी अत्यंत दु:खद दिवस – अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बिपीन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “देशासाठी अत्यंत दु:खद दिवस आहे. देशाने सीडीएस बिपीन रावत यांना अपघातात गमावलं. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी परिश्रमपूर्वक मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात व्यक्त करता येणार नाही. मला खूप दुःख झालं आहे,” असं अमित शहा म्हणाले.

धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशासाठी मोठं नुकसान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक व्यक्त केला आहे. हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे अशा, शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.

देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते, त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे शोकसंदेशात नमूद केले आहे.


हेही वाचा – Bipin Rawat Helicopter Crash: बिपीन रावत यांचं अकाली निधन देशाचं कधीही भरून न येणारं नुकसान – राजनाथ सिंह


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -