शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये बंडाची शक्यता, डॅमेज कंट्रोल करण्याची कमलनाथांवर जबाबदारी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सावधगिरी बाळगत हे डॅमेज कंट्रोल सांभाळण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यावर सोपवली आहे.

Kamal Nath

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचे राजकरण ढवळून निघाले असून या बंडाचे लोण आता काँग्रेसमध्येही पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सावधगिरी बाळगत हे डॅमेज कंट्रोल सांभाळण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यावर सोपवली आहे.

याचपार्श्वभूमीवर कमल नाथ तातडीने मुंबईत पोहचले आहेत. पक्षाने त्यांची महाराष्ट्राचे निरिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. कमल नाथ महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर काँग्रेससह इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यावेळी मविआ नेत्यांकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमल नाथ या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती सोनियांना देणार आहेत. दरम्यान, मुंबईत पोहचताच कमल नाथ यांनी सध्या देशात सौद्याचे राजकारण सुरू असून मध्यप्रदेशमध्ये जे काही झाले त्याबद्दल सगळ्यांना माहित असल्याचे सांगितले. तसेच सध्याचे राजकारण हे आपल्या देशाच्या संविधानाच्या नेमक्या विरु्दध पद्धतीने सुरू असून भविष्यासाठी धोकादायक असल्याचा इशाराही यावेळी कमल नाथ यांनी दिला. तसेच आता शिवसेनेला स्वत:लाच आमदारांबरोबर बोलण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही कमल नाथ यांनी म्हटले. यादरम्यान काँग्रेसमध्ये कोणीही विकाऊ आमदार नसल्याचा दावा कमल नाथ यांनी केला.

महाराष्ट्रात बंडखोर नेत्यांमुळे सरकार संकटात सापडल्याचे स्पष्ट होताच सोनिया यांनी कमल नाथ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतरच कमल नाथ यांच्यावर महाराष्ट्राचे निरिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात कमल नाथ मविआमधील ज्येष्ठ नेत्यांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने त्यांचे सर्वच्या सर्व ४४ आमदार हे बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबरच काँग्रेसचेही काही आमदार नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. त्याचे खंडन करताना काँग्रेसने सर्वच सर्व आमदार थोरात यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मविआ सरकारला कुठलाही धोका नसल्याचे सांगितले होते. तसेच भाजप ज्याप्रकारे देशात राजकारण करत आहे तेच महाराष्ट्रातील संकटाचे कारण असल्याचेही ते म्हणाले होते.